#BappaMorya ग्रामीण पथकांनी आणला मिरवणुकीत जोश

Dhol-Tasha
Dhol-Tasha

ग्रामीण भागात पूर्वी मनोरंजनाची साधने मर्यादित होती. दिवसा शेतीची कामे करून मंडळी सायंकाळी घराकडे परतत. रात्रीच्या जेवणानंतर गावातले वयस्क मारुतीच्या पारावर नाहीतर विठोबाच्या देवळात भजन-कीर्तनासाठी एकत्र येत आणि टाळ-मृदंगाच्या साथीत भजन म्हणून मध्यरात्रीला घरी परतत. तरुण पोरं-बाळं संध्याकाळी तालमीत रग जिरवून आल्यानंतर आपली उर्वरित ऊर्जा ढोल-ताशा-लेझीम-झाजांच्या वादनात व्यतीत करीत असत. हातात रेशमी गोंडे लावलेल्या झांजा, कमरेला भगवी लुंगी, अंगात बनियन किंवा भगवा टी-शर्ट, व्यायामाने सुदृढ बनलेले गोटीबंद शरीर अशा रूपात ही तरुण मंडळी वादनात रंगून जात. ढोल-ताशाच्या प्रचंड गजरावर झांजा-लेझीम खेळताना त्यांना जगाचा विसर पडायचा. अंगावरून घामाच्या धारा वहात असतानाही पायाचा ताल मात्र चुकायचा नाही. या मंडळींनी शहरातल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका धुंद करून टाकल्या. मंडळाच्या मांडवापाशी येताच हातावर भाकरी घेऊन गोल करून खाणारी ही मंडळी नंतर आपल्या ऊर्जेच्या जोरावर तमाम अबाल-वृद्धांना थिरकायला लावायची. एकूणच या खेळात एक प्रकारचा मर्दानी रांगडेपणा असायचा. 

अस्सल महाराष्ट्राच्या मातीचा वास होता या मावळ मुळशीच्या पथकांना. शहरात वादनाच्या सुपाऱ्यांमधून मिळालेले उत्पन्न ही मंडळी गावाकडील देवळांच्या जीर्णोद्धारासाठी, ग्रामपंचायतीसाठी किंवा अन्य विकास कामांसाठी वापरायची. त्या काळात किरकटवाडी, कोंढवे-धावडे, तळेगाव-मावळ परिसरातल्या पथकांचा प्रचंड बोलबाला होता. या पथकांनी मिरवणुकांना अस्सल रांगडेपणा दिला. लेझीम खेळताना विविध रचना, झांजा खेळताना गोफ विणण्याचे कौशल्य ही मंडळी दाखवायची.

कोकणातल्या दशावतारासारखे किंवा ऐतिहासिक प्रसंग ही मंडळी चालत्या मिरवणुकीत सादर करायची. आता त्या पुढचे पाऊल म्हणजे ‘लेक वाचवा’, ‘स्वच्छ भारत’ असे संदेश ही मंडळी आपल्या खेळांमधून देतात. धनकवडी भागातील जयनाथ पथकासारखी पथके यात अग्रभागी आहेत. या मंडळींचे वादन आणि नर्तनाकडे पाहूनच शहरी मंडळी ढोल-ताशांकडे आकर्षित झाली नसती तरच नवल होते. त्यातून प्रथम उगम झाला तो शालेय पथकांचा.

काही कारणांनी नूमवि प्रशालेचे वाद्यपथक बंद झाले आणि त्या मंडळींनी एकत्र येऊन २००१ मध्ये शिवगर्जना या पहिल्या बिगर शालेय पथकाची स्थापना केली. त्यानंतर आजपर्यंत शहरी पथकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. आजमितीला सुमारे १७० पथके एकट्या पुण्यात असून त्यात सहभागी होणाऱ्या युवक-युवतींनी आपल्या वादनाने श्री गणेशाला आणि त्याच्या भक्तांना भुरळ घातली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com