सोन्या मोत्यांच्या पावलाने गौर आली गौर... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पुणे : सनई चौघड्यांचे सुरात रांगोळ्यांच्या पावलांवरून ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे भाद्रपद शुद्ध अष्टमीला अनुराधा नक्षत्रावर घरोघरी उत्साहात आणि आनंदात आगमन झाले. प्रथा आणि परंपरेनुसार विधिवत पद्धतीने काहींच्या घरी खड्याच्या तर काहींच्या घरी उभ्या गौरी बसविण्यात आल्या. कुलाचाराप्रमाणे गौरींची पूजा करून मेथीच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. 

सोन्या मोत्याच्या पावलाने गौर आली गौर...असे म्हणत महिलावर्ग गौरीचे मुखवटे मिरवून आणत होत्या. गौरी आगमनाप्रीत्यर्थ घरोघरी नागरिकांची लगबग होती. गौरी बसविण्याचा दिवसभर मुहूर्त असल्याने तिन्ही सांजेलाही अनेकांनी गौरी बसविल्या. महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसरात मंगळवारी (ता.29) देखील गौरीच्या मुखवट्यांसहित विविध प्रकारचे सजावट साहित्य, पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. 

गौरीला मणी-मंगळसूत्र, मुकुट, हार यांसह खण-नारळाची ओटी भरून माहेरवाशिणीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कापसाच्या वस्त्रासह विविध वस्त्रालंकारांनी गौरीला सजविणे. गौरीपुढे नानातऱ्हेचे खाद्यपदार्थांचा नैवेद्य ठेवणे. गौरीची सजावट करणे, यांसारख्या कार्यात महिला दिवसभर व्यग्र होत्या. उद्या नवमीला (ता.30) गौरीपूजन व भोजनाचा दिवस आहे. या दिवशी सोळा प्रकारच्या भाज्या करण्याचीदेखील पद्धत असते; परंतु सोयीनुसार शक्‍य तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. त्यामुळे महात्मा फुले मंडईतदेखील विविध प्रकारच्या भाज्या खरेदी करण्याकरिता नागरिकांनी हजेरी लावली होती. काहींच्या घरी गौरी आगमनाप्रीत्यर्थ सत्यनारायण पूजादेखील करण्यात येते. त्यामुळे पूजेचे साहित्यही नागरिक खरेदी करत होते. दशमीला (ता.31) दिवसभर मूळ नक्षत्र आहे. त्यामुळे दिवसभरातून केव्हाही महिला गौरींचे विसर्जन करू शकतील. तत्पूर्वी दही-भात किंवा दही-पोह्याचा नैवेद्य दाखवावा, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे.