शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मंडळांनी भाविकांचे वेधले लक्ष

लक्ष्मी रस्ता - मिरवणुक पहाण्यासाठी झालेली गर्दी.
लक्ष्मी रस्ता - मिरवणुक पहाण्यासाठी झालेली गर्दी.

सनई चौघड्याच्या मंगलमय सुरावटी... ढोलताशा पथकांचे लयबद्ध वादन... सोबतीला डॉल्बीचा दणदणाट... आणि विद्युत रोषणाईसह समाजप्रबोधनपर आणि पारंपरिक देखाव्यांच्या रथावर विराजमान झालेल्या बाप्पाला आनंदोत्सवात गणेश मंडळांनी निरोप दिला. मानाच्या गणेश मंडळांनंतर लक्ष्मी रस्त्यांवरून सव्वाशेवे वर्ष साजरे करणाऱ्या गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. 

शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांमध्ये काळभैरवनाथ तरुण मंडळ, वीर शनिवार मारुती मंडळ, नागनाथपार सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सोमवार पेठ दत्त तरुण मंडळ, गणेश पेठ पांगुळआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी मंडळांचा समावेश होता. या मंडळांपुढे गंधाक्ष, आम्ही पुणेकर, वज्र, गजर, गुरुजी प्रतिष्ठान, नादब्रह्म, विमलाबाई गरवारे प्रशाला, रमणबाग प्रशालेच्या ढोलताशा पथकांनी तालबद्ध सुरेल वादन करून भाविकांची मने जिंकली. 

त्वष्टा कासार समाजसेवा संस्था या मंडळाने श्रद्धांजली रथ साकारून दिवंगत व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘मोबाईलच्या दृष्ट चक्रातून बाहेर पडा’, असा संदेशही दिला. थर्माकोलच्या गजरथावर लोखंडे तालीमच्या श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. नगरकर तालिम मंडळाच्या बाप्पा काल्पनिक मंदिरात विराजमान झाला होता.

गणपती चौक मित्र मंडळाची लालबागच्या राजाची श्रींची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. मुंजाबाचा बोळ मित्र मंडळाने रथावर केलेला सर्कसचा देखावा लहानमुलांचे आकर्षण ठरला. सायंकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरून गेलेल्या या मंडळांचे देखावे मोबाईलमध्ये टिपण्यात आणि फेसबुक, ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करून देश-विदेशांतील नागरिकांनाही मिरवणुकीचा आनंद दिला. 

लाकडांमध्ये कोरीव काम केलेल्या १२६ वर्षांपूर्वीच्या रथात विराजमान झालेली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची योद्धा गणेशमूर्ती मध्य रात्री सव्वा बाराच्या सुमारास भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत बेलबाग चौकात दाखल झाली. ध्वजपथकांनी आणि तीन ढोल पथकांनी सादर केलेल्या वादनाला भक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि हात वर करून दाद दिली. पाठोपाठ अखिल मंडई आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती स्ट्रस्टच्या श्रींचे आगमन बेलबाग चौकात झाले. 

टिळक चौकाकडून बेलबाग चौकाकडे गर्दीचा लोंढा अधिक होता. मात्र, गणपती शेडगे विठोबा चौक ते गणपती चौक या दरम्यान मध्य रात्री साडेबारा वाजल्यापासून काही काळ लक्ष्मी रस्त्यांवरील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे ढोल पथके, मंडळाचे कार्यकर्ते आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.  
मुख्य मिरवणूक मार्गावर श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि मंडई गणपती दाखल झाल्यानंतर बेलबाग चौकासह गणपती चौक, कुंटे चौक येथे चेंगराचेंगरी झाली.

अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ मंडळ या मिरवणूक मार्गावर अंतर पडले होते. श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ मंडळ यामध्येही अंतर पडले होते. त्यामुळे लक्ष्मी रस्त्याला येऊन जोडणाऱ्या मार्गावरून आलेले अमृत महोत्सवी गणपती मंडळ पोलिसांकडून मिरवणूक मार्गावर सोडण्यात आले. त्यामुळे बेलबाग चौकातून लवकर निघूनही अखिल मंडई मंडळाचा गणपती सव्वा सहाच्या सुमारास टिळक चौकात दाखल झाला. या मिरवणुकीसमोर बॅण्ड पथक, ढोल-ताशा-ध्वज पथकांच्या नादस्वरामध्ये विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. 

मध्यरात्रीनंतर पहाटपर्यंत गर्दीचा पूर
टिळक चौकात विविध रस्त्यांवरून येणाऱ्या गर्दीचा पूर मध्यरात्रीनंतरही कायम होता. केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्यांवरून टिळक चौकात दाखल होणाऱ्या गणेश मंडळांच्या समोर ढोल-ताशा-ध्वज पथकांसह, बॅण्ड पथकाच्या साथीने लाडक्‍या बाप्पाला ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘बाप्पा गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा जयघोषात निरोप देण्यात आला. रात्री अकराच्या सुमारास बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर आलेला ‘जिलब्या मारुती गणपती मंडळा’ची विसर्जन मिरवणूक लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) रात्री तीनच्या सुमारास आला. यंदाच्या वर्षी ‘जगातील सर्व देशांच्या ध्वजांचा सन्मान करणारा रथ’ साकारण्यात आला होता. त्यानंतर पहाटे चार वाजून दहा मिनिटाला हुतात्मा बाबू गेणूच्या गणपती मंडळाचा दोन बैलजोडीसह मिरवणूक रथ पारंपरिक वाद्यांचा नगारखाना, ढोल-ताशा-ध्वज पथकासह दाखल झाला. त्यानंतर यंदाच्या वर्षी महोत्सवी मंडळाला मान म्हणून लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्याची संधी मिळाल्यामुळे ‘छत्रपती राजाराम गणपती’ मंडळाच्या ‘साईरथा’च्या आगमनाने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. 
 

सकाळी सहा वाजता पुन्हा ‘कल्ला’

कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावरील मिरवणूक सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू झाली. ध्वनिवर्धकावरील बंदीची मर्यादा संपल्याबरोबर सकाळी सहा वाजता सर्वच मंडळांच्या ‘स्पीकर’चा दणदणाट सुरू झाला. उडत्या चालीच्या गाण्यांवर नाचण्यास कार्यकर्त्यांनी सुरवात केली. याच काळात लक्ष्मी रस्त्यावरून अखिल मंडई मंडळाचा ‘जगदंब रथ’ आणि त्यापाठोपाठ ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’ टिळक चौकात दाखल झाला. अखिल मंडई मंडळाच्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे पांचाळेश्‍वर घाट येथे पावणेसातच्या सुमारास आणि ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’च्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे सात वाजून ५५ मिनिटांनी विसर्जन झाले. तत्पूर्वी टिळक चौकात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या दोन्ही मंडळांच्या ‘श्रीं’ची आरती झाली. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक गोपाळ चिंतल, प्रवीण चोरबेले, दिलीप वेडे पाटील, संग्राम थोरात आदी उपस्थित होते. 

सकाळीदेखील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा गर्दी करून होते. केळकर, कुमठेकर, टिळक रस्त्यावरील रात्री थांबलेली मिरवणूक संथगतीने चालली होती. सर्वच मंडळांनी ध्वनिवर्धकांचा वापर केला होता. गुलालाचा वापर टाळून कागदी रिबीन आणि विविध रंगांचे स्प्रे उडविण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला होता. तुलनेत टिळक रस्त्यावर गुलालाचा वापर करणाऱ्या मंडळांची संख्या अधिक होती. महिला आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. 

टिळक रस्ता वगळता इतर तिन्ही विसर्जन मार्गांवरील शेवटची गणेश मंडळे सकाळी साडेअकराच्या आसपास टिळक चौकात पोचली होती. त्या वेळी टिळक रस्त्यावरील शेवटच्या नवरंग युवक मित्र मंडळाची मिरवणूक अभिनव महाविद्यालयाजवळ होती. त्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीला गती देण्याचा प्रयत्न केला. हे मंडळ टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे चारही रस्ते वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुले करण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावर नटेश्‍वर घाट येथे अनेक गणेश मंडळांच्या ‘श्रीं’च्या मूर्तींचे विसर्जन होत असल्याने या रस्त्यावर दुपारी ‘स्पीकर’चा दणदणाट सुरू होता. टिळक रस्त्यावरून आलेल्या गोकूळ वस्ताद तालीम तरुण मंडळ ट्रस्टच्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे दुपारी २ वाजून २० मिनिटांनी विसर्जन झाल्यानंतर वैभवशाली मिरवणुकीची सांगता झाली. 

विसर्जन मार्ग आणि सहभागी गणेश मंडळे

२४१ लक्ष्मी रस्ता
१९७ टिळक रस्ता
४७ कुमठेकर रस्ता 
१२७ केळकर रस्ता 
६१२ एकूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com