बाप्पा गेले गावाला... चैन पडेना आम्हाला...

पिंपरी -  श्री. लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनी ढोल पथकातील विद्यार्थिनी खेळ सादर करताना.
पिंपरी - श्री. लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनी ढोल पथकातील विद्यार्थिनी खेळ सादर करताना.

पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक

पिंपरी - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक रात्री सव्वाबारा वाजेपर्यंत चालली. तब्बल साडेअकरा तास चाललेल्या मिरवणुकीत ९१ गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन केले. काही मंडळांनी ‘डीजे’चा दणदणाट केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री बारानंतर आलेल्या गणेश मंडळांचे वाद्य वादन पोलिसांनी बंद केले. त्यानंतर मिरवणूक शांततेत पुढे सरकली.
बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच मंडळांची लगबग सुरू होती.

गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या रथाला आकर्षक सजावट केली होती. दुपारी पाऊण वाजता जी. के. एन. सटर्ड कंपनी मित्र मंडळाने मिरवणुकीत सर्वप्रथम सहभाग घेतला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३६ मंडळांनी गणरायाला निरोप दिला. त्यामध्ये कैलास मित्र, सदानंद तरुण, शिवशंकर, विकास तरुण, प्रेमप्रकाश, संग्राम मित्र, श्री गणेश मित्र, सुपर मित्र आदींचा समावेश होता.

गणेश मित्र मंडळाच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणांनी नृत्य केले. रात्री बारा वाजेपर्यंत ८६ गणेश मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले. रात्री बारानंतर वाद्य वादन बंद करून पाच मंडळांनी गणरायाला निरोप दिला. 
महानगरपालिकेतर्फे संत गाडगे महाराज चौक (कराची चौक) येथील स्वागतकक्षातून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार केला. महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, माजी महापौर कविचंद भाट, माजी स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी, नगरसेविका निकिता कदम आदी उपस्थित होते. 

बाल ताशावादकाची धमाल
पिंपरी येथील नवचैतन्य तरुण मंडळाच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत अवघ्या साडेसात वर्षांचा ताशा वादक सोहम सालपेकर याने धमाल उडवून दिली. त्याने अतिशय उत्तम ताशा वादन करून आपल्या कलेचे अनोखे दर्शन घडविले. कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केलेल्या रथात ‘श्रीं’ची मिरवणूक निघाली. मातृभूमी ढोल ताशा पथकाने रंगतदार खेळ सादर केले.

ढोल-ताशा आणि सनईवादन
पिंपरी येथील श्री लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनी युवती पथकाने रंगतदार ढोल-ताशावादन आणि बरची नृत्य सादर केले. मुख्य विसर्जन मिरवणुकीत रात्री आठ वाजता संघटनेच्या ‘श्रीं’ची मिरवणूक सहभागी झाली. त्रिवेणी संगम सनई सूर संगीत वाद्य पार्टीने (जि. सोलापूर) केलेल्या सनईवादनाने अवघे वातावरण मंत्रमुग्ध झाले.

केंगार महाराज यांनी डोक्‍यावर समई आणि त्यावर पाण्याने भरलेली कळशी घेऊन अचंबित करणारे नृत्य केले. मंडळाच्या गणरायाला आकर्षक फुलांची सजावट होती.  

मोबाईलच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती
नेहरूनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळाने मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणारा देखावा केला. मोबाईलचा अतिवापर आणि ब्ल्यू व्हेल खेळाच्या आहारी जाण्याचे तरुणांमध्ये वाढत चाललेले प्रमाण, मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनिया आजाराबाबत मंडळाने फलकांद्वारे जागृती केली. पर्यावरणपूरक मिरवणुकीवर मंडळाने भर दिला.

डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई
विसर्जन मिरवणुकीत बहुतांश गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्य ढोल-ताशांचा वापर केला. मात्र, काही मंडळांनी रात्री बारापूर्वी ‘डीजे’ वाजविण्यावर भर दिला. ‘सैराट’ चित्रपटातील गीतांवर तरुणाई थिरकली. 

स्वयंसेवी संस्थांचे योगदान
लायन्स क्‍लब (पिंपरी) आणि एमक्‍युअर फार्मास्युटिकल कंपनी (हिंजवडी) यांच्यातर्फे पिंपरीतील झुलेलाल घाटावर निर्माल्यदान उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये दोन ते तीन टन निर्माल्य गोळा झाले. टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसमित्र म्हणून काम केले. काही संस्थांनी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर गणेशभक्तांसाठी नाश्‍ता, चहा आणि अन्नदानाची सोय केली होती.

फुलांची उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी
पिंपरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी फुलांची मुक्त उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी केली. शिवराजे प्रतिष्ठानने फुलांची उधळण केली. विठ्ठल तरुण मंडळाच्या ढोल लेझीम संघाने खेळ सादर केले. मोरे पुष्प भंडार मंडळाने ‘श्रीं’च्या रथाला आकर्षक फुलांची सजावट केली; तसेच फुलांची उधळण केली. अष्टविनायक मित्र मंडळाच्या महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत युवतींनी नृत्य केले. न्यू भारत मंडळाच्या मिरवणुकीत सिंधी तरुण-तरुणींनी जल्लोष केला. ओम साईराम मित्र मंडळाने फटाक्‍यांची आतषबाजी केली. फेटे घालून तरुण-तरुणी सहभागी झाल्या. युगांतर सेना मित्र मंडळाने गुलाल उधळला. जय हनुमान तरुण मंडळाने झांज पथकाचे खेळ सादर केले. भाट समाज तरुण मंडळाने भंडाऱ्याची उधळण केली. ईगल मित्र मंडळाने ‘श्रीं’च्या रथाला फुलांची आकर्षक सजावट केली. सिंहगर्जना मित्र मंडळाने ढोल-ताशांचा खणखणाट केला. सेव्हन स्टार मित्र मंडळाने ‘देहदाना’चा संदेश देणारे फलक लावले होते. गुरुदत्त, सुपर, भागवत तरुण, भवानी, महेश मित्र मंडळ आदी मंडळांनीही विविध खेळ सादर केले.

वैशिष्ट्ये
गुलालाऐवजी भंडारा आणि फुलांची मुक्त उधळण 
काही मंडळांचा अपवाद वगळता पारंपरिक वाद्य ढोल-ताशाला पसंती
तरुण-तरुणींचा उत्साही जल्लोष; नृत्याच्या तालावर थिरकले पाय
रात्री बारानंतर ढोल-ताशा आणि ‘डीजे’चा आवाज पोलिसांनी केला बंद
निर्माल्य दान, अन्नदान, पोलिसमित्र आदी कामांसाठी स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग

ढोल-ताशांचा गजर, चित्तथरारक प्रात्यक्षिके, फुलांची उधळण, आकर्षक रथात विराजमान झालेले गणराय आणि ‘गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात भक्‍तांनी लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. चिंचवडमध्ये अकरा तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. महिलांचा मोठा सहभाग होता.

महापालिकेतर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. या वेळी महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाऊसाहेब भोईर, अपर्णा डोके, अश्‍विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, अनुराधा गोरखे, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास वेताळनगर येथील शिवतेज स्पोटर्स क्‍लबचा गणपती चापेकर चौकातून थेरगाव विसर्जन घाटाकडे रवाना झाला. त्यानंतर मोरया मित्र मंडळ (भोईर आळी), नवयुग भोईराज मंडळ (भोईर आळी), मोरया इन्स्टिट्यूट (चिंचवड), श्री गणेश मंडळ (चिंचवड स्टेशन), हॉटेल पंचशील ग्रुप (चिंचवड स्टेशन), सर्वोदय मित्र मंडळ (काळभोरनगर), हनुमान मित्र मंडळ (संतोषनगर), नव गजानन मित्र मंडळ, सदगुरू गणेश मंडळ (श्रीधरनगर), अष्टविनायक मित्र मंडळ (चिंचवडगाव), जाणता राजा मित्र मंडळ (काळभोरनगर), श्री युवा प्रतिष्ठान (वेताळनगर) अशा १५ मंडळांच्या गणपतींचे सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत विसर्जन झाले. त्यानंतर जवळपास एक तास म्हणजे सव्वाआठपर्यंत कोणत्याही मंडळाची मिरवणूक चौकात आला नाही.

रात्री सव्वाआठ वाजल्यानंतर मंडळांचे गणपती एकामागोमाग एक चापेकर चौकात दाखल होऊ लागले अन्‌ मिरवणुकीमध्ये रंगत आली. बाल तरुण मित्र मंडळ (दळवीनगर) या मंडळाने चित्तथरारक कसरती सादर केल्या. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या रथातून आलेल्या संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळच्या (चिंचवडचा राजा) ढोल पथकाने आपल्या खेळांचे सादरीकरण केले. श्री दत्त मंडळाच्या गणपती मयूर रथातून फुलांची उधळण करीत चापेकर चौकातून विसर्जन घाटाकडे रवाना झाला. त्यानंतर आलेल्या भगतसिंग मंडळाच्या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता.

त्यापाठोपाठ रामेश्‍वर मित्र मंडळ, तुळजाभवानी मित्र मंडळाने वाघ्या-मुरळीच्या नृत्याचा देखावा सादर केला. लक्ष्मी विनायक मित्र मंडळाच्या मिरवणुकीत सर्वांनी भगवे फेटे घातले होते. मिरवणुकीतील सहभागी महिलांनी फुगड्या घातल्या.

गावडे कॉलनी सांस्कृतिक मित्र मंडळाने रथाला फुलांची आरास केली होती. राष्ट्रतेज तरुण मंडळानंतर नवतरुण मित्र मंडळाचा गणपती मान-सन्मान-अभिमान सुवर्ण रथातून वाजत गाजत आला. राणा प्रताप मित्र मंडळाच्या रथाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री अकरा वाजता श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने माहेश्‍वरी-बाहुबली रथात गणरायाला विराजमान केले होते. त्यानंतर श्री समर्थ मित्र मंडळाने भव्य विठ्ठलमूर्ती हा देखावा सादर केला होता. मिल्कमेड मित्र मंडळानंतर आलेला लक्ष्मीनगर सार्वजनिक मंडळाने सुवर्णसिंह रथ, आदर्श तरुण मंडळाचा आकर्षक रथ, शिवाजी उदय मंडळाचा कैलास रथ, समाधान मित्र मंडळ, उत्कृष्ट तरुण मंडळाने खंडेरायाचा देखावा सादर केला. या मिरवणुकीतील महिलांनीही फुगड्या घातल्या.
 

गावडे पार्क मित्र मंडळाचा तुळजाभवानी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पावणेबाराच्या सुमारास नवभारत मंडळाचा गणपती फुलांच्या डमरूवर आरूढ झाला होता. छत्रपती शाहू मंडळाचा सुवर्ण रथ होता. रात्री बारापर्यंत ३२ सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जन घाटाकडे रवाना झाले होते. त्यानंतर पोलिसांनी वाद्ये बंद केली.

त्यानंतर एम्पायर इस्टेट मित्र मंडळ, झुंजार युवक मित्र मंडळ, हनुमान तरुण मंडळ, समता तरुण मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, खंडेराया मित्र मंडळ, श्रीधरनगर युवा प्रतिष्ठान, श्री ओंकार मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळाचे गणपती चापेकर चौकाच्या दिशेने येत होते. अखेरचा गणपती रात्री सव्वाच्या सुमारास विसर्जित झाला. थेरगाव घाटावर एकूण ४२ मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले.

गांधी पेठ मंडळाकडून शपथ
गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, चिंचवडगाव या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता, वाहतूक नियम आणि पर्यावरणाच्या रक्षणाकरिता चापेकर चौकात सामूहिक शपथ घेतली.

स्मशानभूमी समस्येकडे वेधले लक्ष
चिंचवडगावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अंत्यविधीकरिता काळेवाडी किंवा भाटनगर येथे जावे लागते. या समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मयूरेश्‍वर मित्र मंडळाच्या वतीने फलकांमधून लक्ष वेधण्यात आले.

वैशिष्ट्ये
डॉल्बीमुक्‍त विसर्जन मिरवणूक
गुलालाचा अजिबात वापर नाही
मंडळांकडून भाविकांवर फुलांची उधळण
बहुतांश मिरवणुकीत महिलांचा सहभाग
सर्वच मंडळांकडून ढोल-ताशांचे वादन
अनेक मंडळांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिके
 भाविकांकडून मिरवणुकीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com