दीड तासात बाप्पाच्या ३०८२ मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे कार्यशाळा

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी अवघ्या दीड तासात शाडूच्या मातीपासून तब्बल ३०८२ गणेशमूर्ती घडविल्या आणि जागतिक विक्रमाच्या दिशेने गुरुवारी कूच केली. निमित्त होते ते सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर महोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या गणेशमूर्ती कार्यशाळेचे. 

पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे कार्यशाळा

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी अवघ्या दीड तासात शाडूच्या मातीपासून तब्बल ३०८२ गणेशमूर्ती घडविल्या आणि जागतिक विक्रमाच्या दिशेने गुरुवारी कूच केली. निमित्त होते ते सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर महोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या गणेशमूर्ती कार्यशाळेचे. 

पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष कार्यशाळा झाली. त्यात ११६ शाळांमधील ३०८२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात महापालिकेच्या २४ शाळांतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. या उपक्रमात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी सातवी, आठवी आणि नववीच्या वर्गातील होते. कार्यशाळेनंतर विद्यार्थी या मूर्ती घरी घेऊन गेले. प्रत्येक विद्यार्थ्याला सुमारे तीन किलोच्या शाडूच्या मातीचा गोळा देण्यात आला होता. सुमारे ९ टन शाडूची माती त्यासाठी वापरण्यात आली. उपक्रम सुरू झाल्यावर पावसाचा शिडकावा आल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला. विद्यार्थ्यांनी दहा वाजून चाळीस मिनिटांनी मूर्ती तयार करण्यास सुरवात केली आणि १२ वाजून पाच मिनिटांनी पूर्ण झाली. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती डोक्‍यावर घेऊन जयघोष केला.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, आमदार मेधा कुलकर्णी, आयुक्त कुणाल कुमार, नगरसेवक, शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिल्पकार विवेक खटावकर यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन केले.

महापौर म्हणाल्या, ‘‘या उपक्रमाची माहिती विश्‍वविक्रमासाठी ‘गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड’कडे पाठविण्यात आली आहे. त्यांचे काही अधिकारीही यासाठी उपस्थित होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महिनाभरात या विक्रमाबद्दल घोषणा होणार आहे.’’

गणपती बाप्पाचे डोळे आणि दात तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी झाडांच्या बिया वापरल्या असून, त्या बिया रुजवून झाडे तयार करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. धीरज घाटे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपमहापौर डॉ. धेंडे यांनी आभार मानले. 

गणेशोत्सवाच्या इतिहासात नोंद 
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाचा शतकोत्तर महोत्सव साजरा होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबिवण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्याअंतर्गत दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार करण्याच्या उपक्रमाची नोंद, गणेशोत्सवाच्या इतिहासात कायम राहणार आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानतो.’’