गणेश विसर्जनासाठी पालिका सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पुणे - शहरात गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या गणेशोत्सवाची सांगता येत्या मंगळवारी (ता. ५) होणार असून, त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्य मिरवणूक मार्गासह प्रमुख रस्ते, विसर्जन घाट, नदीपात्र आणि वर्दळीच्या ठिकाणी स्वागत कक्ष, कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच, घरगुती गणपतीच्या विर्सजनासाठी सुमारे २५५ ठिकाणी विविध प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 

बाप्पाला निरोप देण्यासाठी सावर्जनिक गणेश मंडळाबरोबर सर्वच यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह  विसर्जनाच्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि सहआयुक्त सुरेश जगताप यांनी विर्सजन तयारीचा आढावा घेतला. तसेच, आवश्‍यक त्या सेवा-सुविधा पुरविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. विसर्जनच्या ठिकाणी मंगळवारी सकाळपासून महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असून, जादा कर्मचारीही उपलब्ध असतील.

तसेच, विसर्जनाच्या ठिकाणी मांडव उभारण्यात आले असून, पुरेशी विद्युतव्यवस्था आणि अन्य यंत्रणा उभारली आहे. त्यात सर्व ठिकाणी २७८ जीवरक्षकांची नेमणूक केली आहे. जागोजागी ५३ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून, तो गोळा करण्यासाठी कामगार नेमले आहेत. निर्माल्य गोळा करण्यासाठी १५३ गाड्या उपलब्ध केल्या आहेत. तसेच, नदीपात्रात परिसरात आरोग्य पथकही राहणार आहेत.