Maratha Kranti Morcha: आंदोलनात एसटीच टार्गेट का?

ST-Fire
ST-Fire

मंचर - क्रांती दिनानिमित्त गुरुवारी (ता. ९) मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. चाकण (ता. खेड) येथे बंद शांततेने सुरू असताना अचानकपणे जाळपोळीचा प्रकार झाला. यामध्ये एसटी व पीएमपी बसना टार्गेट करण्यात आले. जवळपास प्रत्येक आंदोलनात एसटीचाच बळी दिला जातो. हे प्रकार थांबण्यासाठी समाजात जनजागृतीची गरज आहे.

महागाई वाढली, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे बाजारभाव, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाचे आरक्षण, आदिवासी समाज व विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न, असे सगळे प्रश्न या ना त्याप्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबांशी संबंधित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बंदची हाक दिल्यानंतर रस्त्यावर उतरून दगडफेक करून प्रथम टार्गेट केल जात एसटी बसला. पण एसटीचा त्यात काय दोष? तुमचे शिक्षण केले. नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीला जाण्यासाठीही तिचाच उपयोग झाला. आई-वडील व नातेवाइकांना आजारपणाच्या काळात तिनेच दवाखान्यात सुखरूप नेण्याचे काम केले. लग्नसमारंभ, वाढदिवस या आनंदाच्या क्षणातही तिचाच सहभाग आहे. हे वास्तव्य असतानाही तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून दगडफेक व तिचीच जाळपोळ केली जाते. चाकणला रस्त्यावरच्या एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या, प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.

त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या एसटी बससह एकूण ३५ वाहनांना आग लावण्यात आली. हे दृश्‍य पाहून भयभीत झालेल्या महिला, लहान मुलांनी जीव मुठीत धरून तेथून पळ काढला. चाकणच्या स्थानिकांनी अतिशय शांतता मार्गाने हे आंदोलन चालविले होते; पण काही समाजकंटकानी मोर्चात घुसून कायदा हातात घेतला. असे पोलिस तपासात आढळले आहे.

समाजकंटकांनी केलेले कृत्य निश्‍चितच समाजहिताचे नव्हते. त्यातून काय मिळविले? एसटी बस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची मोडतोड करून सर्वसामान्य माणसांचे दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे चार दिवस एसटी गाड्या बंद होत्या. या बंदच्या काळात जो नाहक आणि अनावश्‍यक हिंसाचार झाला, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न मंचर बस स्थानकावरील महिला वाहकांनी उपस्थित केला आहे. चार दिवसांत राज्यात ६३ एसटी बसचे नुकसान झाले आहे.

जाळपोळ, दगडफेक कशासाठी? 
एखाद्या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारणे ठीक. मात्र, जाळपोळ आणि दगडफेक कशासाठी? यातून आजवर काहीही साध्य झालेलं नाही. उलट सर्वसामान्य माणसाचं अमूल्य नुकसान होतं. एखादी घटना किरकोळ असते की त्या घटनेची गावापुरतीच चर्चा असते. पण सोशल मीडियामुळे अनेकदा अतिरंजित माहिती पसरविली जाते. त्याचे पडसाद संबंधित जिल्ह्यात किंवा राज्यात उमटतात. मात्र, नेमकी काय मूळ घटना काय आहे हे कोणालाच माहीत नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com