'फॅसिस्ट' सरकारला हरविण्यासाठी मोठा लढा देण्याची गरज - आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

पुणे - 'भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईच्या नावाखाली राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करत आहे.

पुणे - 'भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईच्या नावाखाली राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये या "फॅसिस्ट' सरकारला हरविण्यासाठी मोठा लढा द्यावा लागेल, फक्त विरोधकांचे एकत्र येऊन यश मिळणार नाही,'' असे मत भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि "प्रबुद्ध भारत' पाक्षिकाचे संपादक ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

"प्रबुद्ध भारत' पाक्षिकाच्या पुणे शहर कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रा. अंजली मायदेव-आंबेडकर, पाक्षिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य या वेळी उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या नोटाबंदी, वस्तू व सेवाकर प्रणाली (जीएसटी) सारख्या निर्णयांवर अपेक्षित गांभीर्याने चर्चा झाली नाही. "जीएसटी' लागू झाल्यामुळे राज्य सरकारे, महापालिका यांचे स्वतंत्र आर्थिक स्रोत कायम राहतील की नाही, याबाबत चर्चा झाली नाही. कॉंग्रेस पक्षाने विरोध केला; मात्र तो वरवरचा होता. दुसरीकडे, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईच्या नावाखालीसुद्धा राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्यावर कारवाई केली जाईल या भीतीने कोणीही भूमिका घेण्यासाठी तयार नाही. ज्या पक्षांना अशी भीती वाटते त्यांना वगळून आघाडी केली जाऊ शकते. पण पूर्वीसारखे विरोधकांचे एकत्र कडबोळे करून सरकारविरोधी लढा यशस्वी होणार नाही.''