पुरंदरच्या विमानतळाला संभाजीराजांचे नाव

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

मुंबई - पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची ५६ वी सर्वसाधारण बैठक वर्षा निवासस्थानी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

मुंबई - पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची ५६ वी सर्वसाधारण बैठक वर्षा निवासस्थानी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

या वेळी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष विश्वास पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्‍यामलाल गोयल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर जमीन संपादित केली जाईल. विमानतळाच्या जागेसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सहा ठिकाणी पाहणी केली व पुरंदर येथील जागेला पसंती दर्शविली. त्यामुळे हा विमानतळ पुरंदरला उभारण्याचे निश्‍चित केले आहे. पुणे विमानतळाच्या विस्ताराच्या मर्यादा लक्षात घेता पुरंदर येथील जागेला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे पुणे येथे नवीन विमानतळाची गेल्या तीस वर्षांपासूनची मागणीही यानिमित्ताने पूर्ण होत आहे. पुरंदर हे छत्रपती संभाजीराजे यांचे जन्मस्थान आहे. या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा केवळ १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे  विमानतळाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे निश्‍चित केले आहे, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

पुरंदर विमानतळाला तेथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनुकूलता दाखविली आहे. त्यामुळे जमीन संपादनाला वेळ लागणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही या कामी मोठे सहकार्य केले आहे. या विमानतळासाठी लोकांनी स्वत:हून जमिनी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जमीन संपादनानंतर तीन वर्षांत विमानतळाचे काम पूर्ण करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

या विमानतळाला २४०० हेक्‍टर जागा लागणार असून चार किलोमीटरच्या दोन धावपट्ट्या असतील. या विमानतळामुळे येथील उद्योग व शेती व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्‍वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

राज्यातील नागपूर, कोल्हापूर, सोलापूर येथील विमानतळांच्या कामांनाही गती देण्यात येईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘पुणे शहरासाठी स्वतंत्र नागरी विमानतळाची बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करणार, असे आश्‍वासन निवडणुकीदरम्यान मी दिले होते. त्याची वचनपूर्ती झाल्याचा आनंद आहे. नवीन ‘छत्रपती संभाजी महाराज’ विमानतळाचा स्मार्ट पुण्याच्या विकासात मोठा हातभार राहील. मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांच्या वतीने मी आभार मानतो.
- अनिल शिरोळे, खासदार 

मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. त्यामुळे पूर्व विभागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. उद्योगधंद्यांनाही त्यामुळे चालना मिळणार आहे. विमानतळाप्रमाणे रिंगरोडचा निर्णयही त्वरित होणे आवश्‍यक आहे. त्याद्वारे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर जोडले जाईल, त्यांनाही या विमानतळाचा फायदा होणार आहे.
- सतीश मगर, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स

Web Title: sambhajiraje name to purandar airport