वारीशी जुळले महिलांचे ऋणानुबंध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

छायाचित्र, सेल्फी टिपणाऱ्या महिला 
पालखीचा प्रत्येकक्षण महिलांनी सेल्फीत "कैद' केला. आयपॅडद्वारे छायाचित्र टिपणाऱ्या, फेसबुक लाइव्हद्वारे पालखीचे दर्शन मित्र-मैत्रिणींना घडविणाऱ्या आणि वारकऱ्यांसमेवत सेल्फी काढणाऱ्या महिलाही सोहळ्यात सहभागी झाल्या. तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वारकऱ्यांची सेवाही केली. दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी महिलांनी गर्दी केली होती. त्यांची प्रत्येक क्षणचित्रे त्यांनी छायाचित्राच्या माध्यमातून टिपली आणि सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर ते शेअरही केली.

पुणे - माऊलीच्या भेटीची आस, ओठी विठू नामाचा गजर अन्‌ टाळ-मृदंगांचा जयघोष एवढ्या पुरताच महिला वारकऱ्यांचा पालखीशी संबंध जोडलेला. पण, माऊलींशी जुळलेला हा भक्तीचा धागा एवढ्या पुरताच मर्यादित नाही. माऊलीची भक्ती असो वा माऊलीच्या "लेकरां'ची सेवा प्रत्येक धाग्यात महिलांचा सहभाग असतोच. हाच धागा अन्‌ पालखीशी जुळलेले महिलांचे ऋणानुबंध त्यांच्या सेवेतून अन्‌ भक्तीतून सोमवारी पाहायला मिळाले. 

सामाजिक उपक्रम अन्‌ वारकऱ्यांची भक्तिभावाने केलेली सेवा असे समीकरण तंतोतंत जुळून आलेले पाहता आले. पुण्यात मुक्कामी असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी जेवण बनविण्यापासून ते त्यांची आरोग्य तपासणी करण्यापर्यंतच्या प्रत्येक उपक्रमात महिला झाल्या अन्‌ आपल्या कामाने त्यांनी सोहळ्यातील आपल्या उपस्थितीने प्रत्येकाचे लक्ष वेधले. 

दोन्ही पालख्या सोमवारी पुण्यात मुक्कामास होत्या. पालखीच्या दर्शनासाठी महिलांनी गर्दी केली होतीच. पण, सामाजिक उपक्रमातही त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. अगदी जेवण बनवण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत महिलांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. आपल्या कामातून आणि सहभागातून त्यांनी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि सहकार्याच दर्शन घडवलं. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची जबाबदारी चोखपणे बजावली तर महिला डॉक्‍टरांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करत आपले कर्तव्य बजावले. कष्टकरी महिला असो वा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रत्येक वयोगटातील महिलेने मोठ्या उत्साहाने पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा केली. 

ज्योती कांबळे म्हणाल्या, ""मी दरवर्षी वारकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांत सहभाग घेते. त्यांची सेवा केल्याचा आनंद वेगळाच असतो. एरवी वेळ मिळत नाही. पण, पालखीच्या निमित्ताने वेळ काढून वारकऱ्यांची सेवा केल्याचे समाधान शब्दात व्यक्त करता येणार नाही.''