#SaathChal फुटबॉलपटू ते पखवाजवादक

#SaathChal फुटबॉलपटू ते पखवाजवादक

पिंपरी - गेल्या ६१ वर्षांपासून फुटबॉलपटू, पंच आणि  क्रीडा संघटक म्हणून काम करतानाच किसन गायकवाड यांची पुण्यातील नरवीर तानाजीवाडी येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरामध्ये रात्री भजन, कीर्तनात पखवाज वादनाची अखंडित सेवा सुरू आहे. त्यांनी अनेक नामवंत कीर्तनकारांना साथ केली आहे. 

औद्योगिक क्रीडा क्षेत्रात किसन गायकवाड हे स्पर्धा संयोजक, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेत कार्यरत आहेत. लहानपणापासूनच विठ्ठलचरणी पखवाज वादनाची ते सेवा देत आहेत. नरवीर तानाजीवाडी येथे त्यांचे निम्म्याहून अधिक आयुष्य सरले. घरापासून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर काही पावलांवरच होते. त्यामुळे  दहाव्या वर्षीच ते मंदिराकडे वळाले.         

गायकवाड म्हणाले, ‘‘१५ व्या वर्षापासून मी पखवाज वादनाचे धडे गिरविले. १६ व्या वर्षी हार्मोनियमवादक मित्र दिनकर जगताप यांच्यासह संगीत सम्राट शांताराम दीक्षित यांच्याकडे पखवाज वादनाचा रियाज सुरू केला. परंतु, फुटबॉल सामन्यांमुळे दोन वर्षेच रियाज करता आला. फुटबॉल पंच म्हणूनही काम करू लागलो. स्पर्धेत पंच म्हणून काम करतानाच दिवसा खेळाचा सराव आणि सामन्यांत सहभाग, तर रात्री भजन, असा दिनक्रम सुरू होता. १९७८ मध्ये शितोळेमामा यांच्याकडे पखवाज वादनाचा रियाज परत सुरू झाला. जन्माष्टमी, रामजन्म, हनुमान जयंती, काकड आरती, अखंड हरिनाम सप्ताहात साथ केली. आळंदी-पुणे असे वारीत चालत राहिलो.’’ थिसेनक्रूपमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांची भजन, कीर्तनात सेवा सुरूच आहे. त्यांनी रामदास बुवा मनसुख, गणेश महाराज कारले, श्रीकांत महाराज पाटकर, नंदकुमार लांडगे, चंद्रकांत महाराज वांजळे आदींना साथ दिली आहे. 

विठ्ठल-रुक्‍मिणीवरील प्रेमापोटी पखवाज सेवा साध्य करू शकलो. अजूनही पांडुरंगाची कृपा असेल, तर त्यांच्या चरणी अशीच सेवा सुरू ठेवेन. तेच खरे माझ्या जीवनाचे सार्थक आहे.
- किसन गायकवाड, पखवाज वादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com