#SaathChal ‘साथ चल’मध्ये आज पुणेकर घेणार शपथ

SaathChal
SaathChal

पुणे - ‘आई- वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे,’ असा संदेश देणाऱ्या ‘साथ चल’ उपक्रमाची पुढील वाटचाल शहरातून सोमवारी (ता. ९ जुलै) होणार आहे. त्यात हजारो पुणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. शहरातून पूलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानकाच्या आवारातून सकाळी सात वाजता या उपक्रमाला सुरवात होईल. सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्सतर्फे यंदा आषाढी वारीत ‘वारी विठुरायाची आणि आई- वडिलांच्या सेवेची’ ही संकल्पना या उपक्रमातून राबविण्यात आली आहे. 

या ‘साथ चल’ या उपक्रमात संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थापन समिती आणि मानकरी सहभागी होणार आहेत. आई- वडिलांच्या सेवेत लीन असणाऱ्या पुंडलिकासाठी पांडुरंग विटेवर उभा आहे. त्याच्या सेवेचा हा महिमा ओळखून ‘सकाळ’ने यंदा ‘साथ चल’ ही मोहीम हाती घेतली आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसमवेत पुणेकरांनीही दोन पावले चालावीत, असा त्या मागे उद्देश आहे. या उपक्रमाला आळंदी आणि देहूमधून शुक्रवारी प्रारंभ झाला. त्याचा पुढचा टप्पा आता पुण्यातून सुरू होत आहे. या दोन्ही पालख्यांचे शहरातून रविवारी सकाळी प्रस्थान होणार आहे. पूलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानकाच्या आवारात सकाळी सात वाजता विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात आई- वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी सहभागी पुणेकरांना शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी रवाना झाल्यावर शेवटच्या दिंडीमागून हडपसरच्या गाडीतळापर्यंत ‘साथ चल’ उपक्रम राबविला जाईल.

दरम्यानच्या अंतरात भैरोबानाला येथील शिवरकर विद्यालय, मगरपट्ट्याजवळील लोहिया उद्यान येथेही नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. 

महापौर मुक्ता टिळक यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन, जैन आदी धार्मिक संघटना व विविध समूह घटक, गणेश मंडळे, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्था व संघटना, कामगार संघटना, रिक्षा संघटना, वकील, डॉक्‍टर, व्यापारी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्‍लब ही त्यात सभाही होणार आहेत. इतकेच नव्हे, तर राज्य राखीव दलाचे (एसआरपीएफ) १०० जवानही पारंपरिक समारंभासाठीच्या वेषात या उपक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती समादेशक सुनील फुलारी यांनी दिली. ‘सकाळ’चे तनिष्का गट, ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) विद्यार्थीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील. 

‘साथ चल’ बाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठका होत आहेत. शाळा- महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी शपथ घेतली आहे. विविध समाज घटकांनीही बैठकांमध्ये शपथ घेऊन या उपक्रमात सहभागी होण्याची ग्वाही दिली आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावरही ‘साथ चल’बाबत विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करीत पुणेकरांनी प्रतिसाद दिला आहे. ‘साथ चल’साठी ‘सकाळचे उपसंपादक पीतांबर लोहार यांनी लिहिलेले आणि संगीत दिलेले, हर्षित अभिराज यांनी गायलेले गीतही या सोहळ्यादरम्यान ऐकता येणार आहे. 

‘साथ चल’ हा ‘सकाळ’चा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या गाभ्याला भिडणारा आहे, अशी प्रतिक्रिया आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक यांनी व्यक्त केली आहे, तर साथ चलच्या माध्यमातून समाजप्रबोधनासाठी ‘सकाळ’ केलेल्या उपक्रमाची लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. देवस्थानचे मानकरी राजाभाऊ चोपदार, पालखी सोहळा मालक, बाळासाहेब आरफळकर, मानकरी बाळासाहेब चोपदार, विश्‍वस्त योगेश देसाई यांनीही ‘साथ चल’ उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com