विरोधी पक्षनेते पदासाठी 13 जण इच्छुक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते या पदावर काम करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील 13 नगरसेवकांनी इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचे नेते अजित पवार याबाबत सोमवारी (ता. 6) किंवा मंगळवारी (ता. 7) निर्णय घेणार आहेत. 

पुणे - महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते या पदावर काम करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील 13 नगरसेवकांनी इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचे नेते अजित पवार याबाबत सोमवारी (ता. 6) किंवा मंगळवारी (ता. 7) निर्णय घेणार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडून आलेल्या सुमारे 40 नगरसेवकांची बैठक रविवारी सकाळी झाली. पवार यांच्यासमवेत महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष आणि खासदार ऍड. वंदना चव्हाण या प्रसंगी उपस्थित होते. नव्या सदस्यांचा परिचय झाल्यावर पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांसाठी एकमत होत असेल, तर सांगा असे आवाहन केले. परंतु एकमत झाले नाही. त्यामुळे चव्हाण यांनी विरोधी पक्षनेता निवडण्याचे सर्वाधिकार पवार यांना द्यावा, असे सुचविले. त्याला उपस्थितांनी अनुमोदन दिले. त्यानंतर पवार यांनी ""महापालिका निवडणुकीत आपण प्रयत्न केले. परंतु बदल कसा झाला, हे समजत नाही. परंतु या पुढील काळात पक्ष पुन्हा उभारी घेईल. आपण महापालिकेत विरोधी पक्षात असलो, तरी जागरूक विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे,'' असे त्यांनी आवाहन केले. दरम्यान, निवडून आलेल्या नगरसेवकांची विभागीय आयुक्त कार्यालयात एक- दोन दिवसांत नोंदणी होणार आहे. त्यासाठी महापौर जगताप समन्वय साधतील, असे पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षनेतेपदासाठी चंचला कोद्रे, वैशाली बनकर, अश्‍विनी कदम, सुमन पठारे, रेखा टिंगरे, चेतन तुपे, विशाल तांबे, दीपक मानकर, दत्तात्रेय धनकवडे, बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे, बंडू गायकवाड आदींची नवे चर्चेत आहेत. 

बैठकीत ध्वनिफित 
पक्ष कार्यालयातील एकाने, उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्याचे मोबाईलवरील रेकॉर्डिंग विशाल तांबे यांनी बैठकीतच जाहीरपणे अजित पवार यांच्यासमोर ऐकविले. त्याची दखल घेत संबंधित कार्यकर्त्याला बैठकीतून जाण्यास पवार यांनी सांगितले. तसेच उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच केले.