पुणे: प्रत्येकाचा 5 लाखांचा विमा, 'PMP'ला 145 कोटी

मंगेश कोळपकर
गुरुवार, 11 मे 2017

मुळा, मुठा नदी सुधारणेसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने हे दिलासादायक ठरेल. तर 'ई गव्हर्नन्स'साठी 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी 'पीएमपी'करीता 145 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, महापालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक मिळकत करदात्याचा 5 लाख रुपयांचा अपघाती विमा, तसेच नदी सुधारणा व ई गव्हर्नन्ससाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आज 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. एकूण 5 हजार 912 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 20 मार्च रोजी 5 हजार 600 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. मुळा, मुठा नदी सुधारणेसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने हे दिलासादायक ठरेल. तर 'ई गव्हर्नन्स'साठी 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचा उतरविण्यात येणार असून, त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

महापालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेज सुरू करणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिका कोथरूड परिसरात 5 कोटी रुपये खर्च करून रुग्णालय उभारणार आहे. दरम्यान, शहरातील कचऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला असताना कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी 78 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

कोथरूड शिवसृष्टीसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आहे. शहरात विविध ठिकाणी योग केंद्र उभारणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता ते कर्वेनगर दरम्यान मुठा नदीवर पूल उभारणार असून, त्यासाठी 2 कोटी रुपये एवढ्या अंदाजित खर्चाची तरतूद आहे. तसेच, पुणे विद्यापीठ चौकात ग्रेडसेप्रेटर निर्माण करण्यात येणार आहे. 
 
वास्तववादी अर्थसंकल्प : मोहोळ

"परिवर्तनामुळे वाढलेल्या पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, हा अर्थसंकल्प वास्तववादी आहे. त्याची संपूर्ण अंमलबजावणी होऊ शकते."

मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष स्थायी समिती