दीड हजार अर्ज प्रलंबित!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पुणे - ‘सरकारी काम अन्‌ सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय नागरिकांना हवेली तहसील कार्यालयामध्ये येत असून, गेल्या सहा महिन्यांपासून या कार्यालयात दीड हजारांपेक्षा अधिक सातबारा काढणे आणि फेरफारसाठीचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, अपुरे मनुष्यबळ, किऑक्‍स मशिनची वानवा आणि निवडणूक प्रक्रियेमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुणे - ‘सरकारी काम अन्‌ सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय नागरिकांना हवेली तहसील कार्यालयामध्ये येत असून, गेल्या सहा महिन्यांपासून या कार्यालयात दीड हजारांपेक्षा अधिक सातबारा काढणे आणि फेरफारसाठीचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, अपुरे मनुष्यबळ, किऑक्‍स मशिनची वानवा आणि निवडणूक प्रक्रियेमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

खडकमाळ येथील हवेली तहसील कार्यालयामध्ये आज (ता. १०) सकाळी ११ वाजल्यापासून त्रस्त नागरिकांची गर्दी झाली होती. अखेर त्याची परिणती खुद्द तहसीलदार यांच्याशी शाब्दिक चकमकीमध्ये झाली. ज्या अर्जदारांना काही महिन्यांपूर्वी आजची ‘तारीख’ देण्यात आली होती, त्यांनाही आज रिकाम्या हाताने परतावे लागले. संतप्त नागरिकांनी तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या मांडल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण होते; परंतु तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांनी सेवा पूर्ववत करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. 

धानोरी येथील जागेच्या सातबारासाठी अर्ज केलेले विवेकानंद केशरकर म्हणाले, ‘‘सातबारा आणि फेरफारसाठी १४ जून रोजी अर्ज केला होता; परंतु आजतागायत मला त्याचे उत्तर मिळालेले नाही. केवळ ‘आज या, उद्या या,’ अशी आश्‍वासने मिळत आहेत.’’  

मोशी येथील शेतकरी गणपत ओझरकर म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या एप्रिलमध्ये अर्ज केला होता. त्यानंतर तीन वेळा मला पुढच्या तारखा मिळाल्या. मी शेतातील कामे सोडून दुचाकीवरून २५ कि.मी.चा प्रवास करून येतो; पण मला ‘रेकॉर्ड तपासायला माणसे नाहीत,’ अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळतात.’’

डोणजे येथील रहिवासी अनिल वांजळे म्हणाले, ‘‘गेल्या डिसेंबरमध्ये सातबारासाठी अर्ज केला होता. रेकॉर्डरूममध्ये पूर्वीची जुनी माणसे जाऊन नवीन माणसे आल्याने कागदपत्रांच्या ढिगाऱ्यांमध्ये एकही कागद त्यांना सापडत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.’’

कोंढवा खुर्द येथील रहिवासी राहुल सैंदाणे म्हणाले, ‘‘आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून चकरा मारतोय; पण सातबारा मिळत नाही. कोणालाही तक्रार सांगायला गेले, की सर्व अधिकारी, कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवतात.’’

संकेतस्थळावर जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग केले नसल्याने ऑनलाइन कागदपत्रे काढता येत नाहीत. सुरवातीला तलाठी कार्यालय, मंडल कार्यालयातून मग तहसीलदार कार्यालयात यावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याच्या तक्रारी या वेळी नागरिकांनी केल्या. 

अपुरे मनुष्यबळ आणि निवडणूक प्रक्रियेमुळे हजारो अर्ज प्रलंबित
रोज ८० ऐवजी ४० अर्ज निकालात, शंभर नव्या अर्जांची भर
प्रलंबित अर्जांची एकूण संख्या १५०० हून अधिक

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित अर्जांची संख्या वाढत आहे; परंतु अपुरे मनुष्यबळ, किऑक्‍स मशिनची वानवा आणि निवडणूक प्रक्रियेमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये जादा मनुष्यबळ लावून सर्व अर्ज मार्गी लावले जातील. प्रलंबित अर्जांचा तहसीलदार कार्यालयावरील ताण कमी करण्यासाठी मंडल कार्यालय स्तरावर किऑक्‍स मशिन देता येतील, का याबाबत निर्णय घेतला जाईल. 
- प्रशांत पिसाळ, तहसीलदार, हवेली

Web Title: 1500 form pending