तिच्या पाठीमागे उभा राहावा समाज

तिच्या पाठीमागे उभा राहावा समाज

पुणे- विविध ठिकाणी लैंगिक अत्याचाराची बळी ठरलेल्या महिलेलाच दोष देण्याचा हीणकस प्रकार समाजाने थांबविला पाहिजे. याउलट अशा कठीण प्रसंगात समाजानेच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद तिच्यात निर्माण करावी. त्याहीपुढे जाऊन पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, यादृष्टीने संवेदनशील समाज निर्माण होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा महिलांच्या प्रश्‍नांविषयक काम करणाऱ्या तज्ज्ञ व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.


महिलांना मारहाण, त्यांचे शोषण, छळ, त्यांच्यावर हल्ले असे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढत आहेत. अशा घटनांनी समाजमन ढवळून निघते. या घटनांना रोखण्यासाठी कायदे असूनही त्या वाढतच आहेत. या पार्श्‍वभूमीवर महिलांबाबत सामाजिक दृष्टिकोन कसा बदलता येईल, यावर महिलांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्यांनी आपली मते 'सकाळ'कडे मांडली.


मानवी हक्कांसाठी कार्य करणाऱ्या सहयोग संस्थेच्या सचिव ऍड. रमा सरोदे म्हणाल्या, ""कुठलेही कायदे हे दुर्बल घटकांसाठी केले जातात. त्याप्रमाणे स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढतात म्हणून त्यांच्यासाठी कायदे होतात. पुरुषप्रधान संस्कृतीने हे समजून घेत समता, समानतेकडे आपण कसे जाऊ याचा विचार करावा. कायदे करतानाच त्याची कडक अंमलबजावणी कशी होईल, यासाठी त्याचेही "सोशल ऑडिट' करावे. समाजाला महिलांविषयीच्या कायद्यांची माहिती करून द्यावी. पीडित महिला आणि अंमलबजावणी करणाऱ्या घटकांत समन्वयासाठी स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते व समाजाला प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यामुळे समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.''

कौटुंबिक सल्ला केंद्राच्या संस्थापक ऍड. शारदा वाडेकर म्हणाल्या, ""कौटुंबिक हिंसा, महिला, युवतींवरील बलात्कार, बाल लैंगिक शोषण, कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर समस्या रोखण्यासाठी, विशेषतः दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर फौजदारी कायद्यात बदल होऊन ते अधिक कडक झाले; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. बलात्कार, शारीरिक दुखापत, शारीरिक छळ, मानसिक त्रास सोसणाऱ्या महिलांना मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय व आर्थिक मदत आणि अन्य सुविधा देण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन झाले. परंतु, त्याचाही उद्देश सफल झालेला नाही.'' समाजाच्या दृष्टिकोनाविषयी त्या म्हणाल्या, ""पीडित महिलेस समाजाकडून मिळणारी अपमानाचीच वागणूक थांबली पाहिजे. घडलेल्या घटनेस पीडित महिलेलाच जबाबदार ठरविणे थांबले पाहिजे. समाजाकडून पीडित महिला व तिच्या कुटुंबांना वाळीत टाकले जाते. हे थांबवून तिला अन्यायाविरुद्ध लढण्यास समाजानेच बळ द्यावे.''

पीडित महिलेस समाज कशी मदत करेल
* पीडित महिला, युवतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे
* समुपदेशक, वैद्यकीय व आर्थिक मदत देणे
* महिलांविषयक कायदे व धोरणांविषयी साक्षरतेची गरज
* पीडितांना मदतीसाठी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे
* आरोपीस कडक शिक्षा होण्यासाठी भक्कम पुराव्यांची पूर्तता
* पीडित महिलेचे व तिच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे

पुण्यात 2016 मध्ये घडलेल्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटना - 1650
कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांची कारणे
* हुंड्यासाठी छळ
* पती-पत्नीमधील घरगुती भांडणे
* अहंकार, संशयावरून होणारी भांडणे
* सोशल नेटवर्किंग साइटचा वाढता वापर
* कुटुंबासाठी वेळ न देणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com