चौतीसपैकी 19 गावांत ग्रामपंचायत निवडणुका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

पुणे - महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या 34 पैकी 19 गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले; तर या निवडणुकांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन हवेली तालुका नागरिक कृती समितीने केले आहे.

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणार असलेल्या 34 पैकी 19 गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द व्हाव्यात, यासाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार भीमराव तापकीर यांनी आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात दुपारी भेट घेतली. या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, बाळासाहेब हगवणे, पोपट खेडेकर, सुभाष नाणेकर आदींचा समावेश आहे. त्या वेळी निवडणुका रद्द करण्याची मागणी त्यांनी केली; परंतु निवडणुकीची सुरू झालेली प्रक्रिया थांबविता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, 34 गावे राज्य सरकार महापालिकेत घेणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला.

दरम्यान, निवडणुका होणार असल्या तरी एका महिन्यात गावे महापालिकेत समाविष्ट होणार असल्यामुळे या निवडणुकांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन कृती समितीने संबंधित गावांतील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. 34 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकार 12 जूनपर्यंत घेणार आहे.

Web Title: 19 village grampanchyat election