रिपब्लिकनला हव्यात 28 जागा 

rpi
rpi

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी नव्याने केलेल्या 41 प्रभागांपैकी 23 प्रभागांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे मतदार लक्षणीयरीत्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सत्तेवर येण्यास आसुसलेल्या भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पक्षाचा वाटा दिल्याशिवाय महापालिकेवर भगवा फडकवता येणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. 

रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाची शहराच्या विविध भागांत ताकद आहे. विशेषतः पर्वती, वडगाव शेरी आणि कॅंटोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघांतील झोपडपट्ट्यांच्या परिसरात रिपब्लिकन पक्षाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यातील हडपसर व शिवाजीनगर या मतदारसंघांतही त्यांचे काही प्रमाणात अस्तित्व जाणवते. 

""नव्या प्रभागरचनेत किमान 28 जागी आमचे उमेदवार निश्‍चित निवडून येतील,'' असा विश्‍वास रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. मात्र, स्वबळावर अधिकाधिक जागा निवडून आणून सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नांत असलेला भाजप 28 जागा देईल का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. याबाबत कांबळे यांना विचारले असता त्यांनी चर्चेनेच यातून मार्ग काढू, असे सांगितले. रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीचा भाजपच्या उमेदवारांनाही फायदा होणार आहे, त्यामुळे भाजपने 28 जागा सोडण्यात काहीही गैर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शहरातील 41 प्रभागांतील कोणत्या जागा पक्षाने लढवायच्या याची चाचपणी कार्यकर्त्यांनी नुकतीच केली. त्याच्या आधारे यादी तयार केली आहे. पक्षाने फुलेनगर, नागपूर चाळ प्रभागात तीन जागा, कसबा पेठ- सोमवार पेठ, लोहियानगर- कासेवाडी, कोंढवा खुर्द- मिठानगर आणि वारजे माळवाडी प्रभागातील सर्वसाधारण गटातील जागांवरही दावा केला आहे. 

शहरात अनुसूचित जातीसाठी 22 (एससी) आणि अनुसूचित जमातींसाठी (एसटी) 2 जागा राखीव आहेत, तर, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 44 जागा राखीव आहेत. पक्षाने निश्‍चित केलेल्या जागांबाबत भाजपबरोबर चर्चा करून अंतिम निर्णय होईल. 

चिन्ह निश्‍चित नाही 

भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवायची की पक्षाच्या चिन्हावर, हे रिपब्लिकन पक्षाने अद्याप ठरविलेले नाही. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून घेणार असल्याचे महेंद्र कांबळे यांनी स्पष्ट केले. 

दलित मतदार असलेला प्रभाग 

येरवडा, नागपूर चाळ, विश्रांतवाडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, राजेवाडी, पुणे स्टेशन, मंगळवार पेठ, दापोडी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, अप्पर सुपर, दांडेकर पूल. 

बौद्ध समाजाचे प्राबल्य असलेला भाग 

ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, येरवडा, भीमनगर, मुंढवा, औंध रस्ता, बोपोडी, दांडेकर पूल, डायस प्लॉट, अप्पर-सुपर इंदिरानगर, पद्मावती, पत्रा चाळ, राजेवाडी. 

मातंग समाजाचे प्राबल्य असलेला भाग 

राजेवाडी, कासेवाडी, लोहियानगर, आंबेडकरनगर, अरण्येश्‍वर, बिबवेवाडी- सुखसागरनगर, तळजाई वसाहत, लक्ष्मीनगर, दांडेकर पूल, पाटील इस्टेट, येरवडा-लक्ष्मीनगर. 

रिपब्लिकन पक्षाला हवे असलेले प्रभाग 

1) प्रभाग क्र. 1 ः कळस-धानोरी ः अनुसूचित जाती महिला 2) प्रभाग 2 ः फुलेनगर-नागपूर चाळ ः अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण 3) प्रभाग 3 ः विमाननगर-सोमनाथनगर ः कोणतीही एक जागा 4) प्रभाग 4 ः खराडी-चंदननगर ः अनुसूचित जाती 5) प्रभाग 6 ः येरवडा ः अनुसूचित जाती 6) प्रभाग 7 ः पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी ः अनुसूचित जाती महिला 7) प्रभाग 8 ः औंध-बोपोडी ः अनुसूचित जाती महिला 8) प्रभाग 14 ः डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी ः अनुसूचित जाती 9) प्रभाग 16 ः कसबा पेठ- सोमवार पेठ ः अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण 10) प्रभाग 18 ः खडकमाळ आळी ः महात्मा फुले पेठ ः अनुसूचित जाती महिला 11) प्रभाग 19 ः लोहियानगर-कासेवाडी ः अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण महिला 12) प्रभाग 20 ः ताडीवाला रोड-ससून हॉस्पिटल ः अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण  13) प्रभाग 21 ः कोरेगाव पार्क-घोरपडी ः अनुसूचित जाती 14) प्रभाग 24 ः रामटेकडी- सय्यदनगर ः अनुसूचित जाती 15) प्रभाग 27 ः कोंढवा खुर्द- मीठानगर ः सर्वसाधारण 16) प्रभाग 28 ः सॅलिसबरी पार्क- महर्षीनगर ः अनुसूचित जाती महिला 17) प्रभाग 29 ः नवी पेठ-पर्वती ः अनुसूचित जाती महिला 18) प्रभाग 30 ः जनता वसाहत-दत्तवाडी ः अनुसूचित जाती 19) प्रभाग 32 ः वारजे माळवाडी ः सर्वसाधारण महिला 20) प्रभाग 35 ः सहकारनगर-पद्मावती ः अनुसूचित जाती महिला 21) प्रभाग 36 ः मार्केट यार्ड- लोअर इंदिरानगर ः अनुसूचित जाती महिला 22) प्रभाग 37 ः अप्पर-सुपर इंदिरानगर ः अनुसूचित जाती महिला 23) प्रभाग 41 ः कोंढवा बुद्रुक- येवलेवाडी ः अनुसूचित जाती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com