चार महिन्यांत स्वाइन फ्लूचे 251 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पुणे - शहरात चार महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे 251 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 188 जणांवर यशस्वी उपचार केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याने मंगळवारी दिली. 

पुणे - शहरात चार महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे 251 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 188 जणांवर यशस्वी उपचार केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याने मंगळवारी दिली. 

जानेवारीपासून स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या दोन लाख 75 हजार रुग्णांची तपासणी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून केली आहे. त्यापैकी पाच हजार 252 रुग्णांना या रोगावरील औषध देण्यात आले. स्वाइन फ्लू झालेल्या 188 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमधून यशस्वी उपचार केले आहेत. या रोगाची स्पष्ट लक्षणे दिसणाऱ्या आणि अत्यवस्थ असलेल्या 999 रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्यापैकी 251 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे "एनआयव्ही'ने कळविले आहे. 

स्वाइन फ्लूचा संसर्ग होणाऱ्या "एच1-एन1' विषाणूंमध्ये अंशतः बदल झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

सध्या शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या अत्यवस्थ 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

गेल्या चार महिन्यांत शहरात 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 30 रुग्ण उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते, तर महापालिकेतील 14 रुग्णांचा त्यात समावेश असल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 

स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू 
नगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्‍यातील 53 वर्षांच्या एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे 15 एप्रिल रोजी निदान झाले होते. त्यांना इतर कोणताही आजार नव्हता. 

कडक उन्हाळ्यातही "एच1-एन1' 
एप्रिलनंतर उन्हाचा कडाका वाढू लागल्यानंतर "एच1-एन1' विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण कमी होते, असा शहरातील गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. यंदा मात्र विषाणूंमध्ये अंशतः बदल झाल्याने एप्रिलमध्येही शहर आणि राज्याच्या विविध भागांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली आहे.