भाजपच्या 30 उमेदवारांवर गुन्हे 

सलील उरुणकर 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुण्यात निवडणूक लढविणाऱ्या प्रमुख पक्षांनी पुणेकरांसमोर आणलेले उमेदवार कसे आहेत, त्यांची पार्श्‍वभूमी काय आहे, याचे विश्‍लेषण करणारी ही मालिका. प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर करण्याच्या मालिकेला जोडूनच पक्षनिहाय विश्‍लेषणही "सकाळ'च्या वाचकांसाठी मांडत आहोत. 

पुणे - महापालिका निवडणुकीमध्ये 152 जागांवर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांपैकी 105 उमेदवारांच्या मालमत्तेने कोटीचा आकडा ओलांडला आहे. उमेदवारी मिळालेल्यांपैकी 30 जणांवर गुन्हे दाखल आहेत. पक्षाने खुल्या 86 प्रभागांतून सर्वाधिक जागा मराठा समाजाला तर त्याखालोखाल ब्राह्मण व इतर समाजाच्या उमेदवारांना दिल्या आहेत. 

उमेदवारांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कोटींच्या घरात असणारे चार उमेदवार आहेत. कोरेगाव पार्क- घोरपडी (21) प्रभागातील उमेदवार उमेश गायकवाड यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.67 कोटी रुपये आणि मुंढवा - मगरपट्टासिटी (22) प्रभागातील उमेदवार संदीप दळवी यांचे 1.64 कोटी रुपये आहे. औंध-बोपोडी (8) प्रभागातील उमेदवार विजय शेवाळे यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 4.52 कोटी रुपये आहे आणि सर्वाधिक म्हणजे 195 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. वडगावशेरी-कल्याणीनगर (5) प्रभागातील उमेदवार योगेश मुळीक यांची 119 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.23 कोटी रुपये आहे. 

धायरी-वडगाव बुद्रुक (क्र. 33) प्रभागातील नीता दांगट यांची 55 कोटी, सनसिटी-हिंगणे खुर्द (34) प्रभागातील श्रीकांत जगताप यांची 54 कोटी, सॅलिसबरी पार्क- महर्षीनगर (28) प्रभागातील उमेदवार श्रीनाथ भिमाले यांची 45 कोटी, औंध बोपोडी प्रभागातील प्रकाश ढोरे यांची 43 कोटी तर मुंढवा-मगरपट्टासिटी प्रभागातील दिलीप तुपे व बावधन - कोथरूड डेपो (10) प्रभागातील दिलीप वेडे-पाटील यांची मालमत्ता 39 कोटी रुपयांहून अधिक आहे. रास्ता पेठ - रविवार पेठ (17) प्रभागातील सुलोचना कोंढरे यांची 29 कोटी, धनकवडी-आंबेगाव पठार (39) प्रभागातील प्रवीण भिंताडे यांची 31 कोटी तर आंबेगाव-कात्रज गावठाण (40) प्रभागातील अभिजित कदम यांची 34.80 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सर्वांत कमी मालमत्ता असलेले पाच उमेदवार असून त्यांची मालमत्ता एक लाखांमध्ये आहे. यामध्ये शबनम शेख, उमेश चव्हाण, प्रसाद होले, अश्विनी सूर्यवंशी व वैभव पवार या उमेदवारांचा समावेश आहे. 

सहा उमेदवारांनी आश्‍चर्यकारकरित्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शून्य रुपये दाखविले असून प्रत्येकी पाच हजार व पंचवीस हजार वार्षिक उत्पन्न दाखवणारे दोनच उमेदवार आहेत. 

गुन्हे 
121 जण निष्कलंक 
भाजपने गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या एकूण 30 उमेदवारांना आणि एकही गुन्हा दाखल नसलेल्या 121 उमेदवारांना संधी दिली आहे, असे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. पश्‍चिम पुण्यातील एका उमेदवारावर सर्वाधिक म्हणजे 11 गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येकी एक गुन्हा दाखल असलेल्या चार महिलांसह एकूण 13 उमेदवार आहेत. प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या नऊ आहे. प्रत्येकी तीन गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या सात आहे. 

वयोगटनिहाय उमेदवारांची संख्या 

21 ते 30 वर्षे - 23 
31 ते 40 वर्षे - 54 
41 ते 50 वर्षे - 51 
51 ते 67 वर्षे - 23 

 

शैक्षणिक पात्रता 

प्राथमिक - 22 
माध्यमिक - 18 
उच्चमाध्यमिक - 11 
पदवीधर - 86 
पदव्युत्तर - 14 

व्यवसायनिहाय संख्या 

व्यवसाय व व्यापार - 89 
नोकरी - 7 
गृहिणी - 44 
कृषी - 6 

Web Title: 30 BJP candidates Crime