४१ प्रभागांची ४१ फेसबुक पेजेस !

मंगेश कोळपकर
सोमवार, 23 जानेवारी 2017

महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची स्वतंत्र ४१ फेसबुक पेजेस झळकणार आहेत. त्याला सोशल मीडियाची जोड असल्यामुळे राष्ट्रवादीचा ऑनलाइन प्रचारही जोर धरू लागला आहे. पहिल्या टप्प्यातच सुमारे दीड लाखाहून अधिक पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजला अनुकूल प्रतिसाद दिला आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची स्वतंत्र ४१ फेसबुक पेजेस झळकणार आहेत. त्याला सोशल मीडियाची जोड असल्यामुळे राष्ट्रवादीचा ऑनलाइन प्रचारही जोर धरू लागला आहे. पहिल्या टप्प्यातच सुमारे दीड लाखाहून अधिक पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजला अनुकूल प्रतिसाद दिला आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जंगली महाराज रस्त्यावर हॉटेल सेंट्रल पार्कच्या आवारात वॉर रूम उभारली आहे. शहर स्तरावरील कार्यक्रम, प्रभागातील कार्यक्रम, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी समन्वय, मतदारांची हजारी यादी आदी विविध विषयांवर पक्षाच्या शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण पदाधिकाऱ्यांसमवेत येथून कामकाज पाहत आहेत, तर फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम, वेबसाइट आदी सोशल मीडियाची विंग पक्षाच्या युवती विभागाच्या संघटक मनाली भिलारे आणि त्यांचा चमू सांभाळत आहेत. 

टिळक रस्त्यावरील कार्यालय अपुरे पडू लागल्यामुळे पक्षाने जंगली महाराज रस्त्यावर आता वॉर रूम उभारली आहे. पक्षाचा प्रसिद्ध झालेला जाहीरनामा प्रत्येक प्रभागात मतदारांपर्यंत पोचविणे, निवडणुकीच्या ऑनलाइन प्रक्रियेची इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांना माहिती देणे, पक्षाच्या सभा आणि बैठकांचे नियोजन वॉर रूममधून सुरू आहे. हजारी यादीप्रमुखांचीही कार्यशाळा नुकतीच झाली. आघाडीबाबत राष्ट्रवादीची काँग्रेसबरोबर चर्चा सुरू झाली असली तरी स्वबळावर लढण्याची वेळ आली, तर राष्ट्रवादी सज्ज झाली असल्याची झलक वॉर रूम आणि पक्षाच्या जुन्या कार्यालयातून दिसून येते. याबाबत चव्हाण म्हणाल्या, ‘‘सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने ऑनलाइन प्रचारातही आघाडी घेतली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी आता वक्ता प्रशिक्षण शिबिर होणार असून, यापूर्वीही अनेक नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. वॉर रूमच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा सकारात्मक प्रचार करण्यात येणार आहे.’’ पक्षाच्या संकेतस्थळाला भेट देऊन सुमारे दीड लाखाहून अधिक मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पक्षाचे १२०० हून अधिक व्हॉट्‌सॲपचे ग्रुप आहेत. तसेच प्रत्येक प्रभागातील ग्रुपच्या ॲडमिनचाही ग्रुप वॉर रूमच्या माध्यमातून स्थापन झाला आहे. उमेदवारी निश्‍चितीची प्रक्रिया सुरू असताना आता ४१ प्रभागांतील उमेदवारांचे स्वतंत्र फेसबुक पेज तयार होत आहेत. उमेदवार निश्‍चित झाले, की हे पेज कार्यान्वित होणार आहे. निवडणुकीदरम्यान १० लाख मतदारांशी एसएमएसच्या माध्यमातून संपर्क साधण्याची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच शहरात गेल्या पाच वर्षांत आणि यापूर्वी झालेल्या विकासकामांची माहिती अधिकृत होर्डिंग्ज आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोचवली जात असल्याचे भिलारे यांनी सांगितले. पक्षाच्या वॉर रूमध्ये अशोक राठी यांच्यासह सागर उभे, हेमंत पाटील, ययाती चरवड आदी सक्रिय आहेत.

Web Title: 41 Prabhag & 41 Facebook pages