देवदर्शनावरून परत येताना अपघात; पाच जणांचा मृत्यू 

Pune
Pune

कळस : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर दोन (ता. इंदापूर) येथे स्कॉर्पिओ मोटारीचा (एमएच 20, एजी 0939) टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हे सर्व जण तुळजापूरहून देवदर्शन करून पुण्याकडे जात होते. हा अपघात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. 

टायर फुटलेली स्कॉर्पिओ दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या एका मोटारीवर (एमएच 14, जीए 9835) आदळली. यातील पिंपरी चिंचवड भागातील पाच जण जखमी झाले. 

प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय 67), सुनीता प्रकाश गायकवाड (वय 58), संदीप प्रकाश गायकवाड (वय 40), शीतल संदीप गायकवाड (वय 32), अभिराज संदीप गायकवाड (वय 5, सर्व जण रा. नाना-नानी पार्क, यमुनानगर, निगडी) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याच स्कॉर्पिओ मोटारीतील प्रमोद प्रकाश गायकवाड (वय 32), हेमा प्रमोद गायकवाड (वय 29) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

दुसऱ्या मोटारीचा चालक शार्दूल बापू गुरव (वय 22), बापू विश्वनाथ गुरव (वय 52), कल्पना बापू गुरव (वय 48), वैष्णवी बापू गुरव (वय 20, सर्व रा. पिंपरी चिंचवड), सौरभ बजरंग गुरव (वय 19, रा. शिवाजीनगर, पुणे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टायर फुटल्यानंतर स्कॉर्पिओ उलटून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर येऊन पडली. अपघातानंतर सुमारे अर्धा तास जखमींना मदत मिळू शकली नाही. येथील महामार्ग पोलिस मदत केंद्रापासून जवळच हा अपघात झाला. मात्र, महामार्ग पोलिसांकडे ना रुग्णवाहिकेची सोय आहे, ना क्रेनची. यामुळे अपघात पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनीच पुढे येत उलटलेली स्कॉर्पिओ सरळ केली. स्कॉर्पिओचा चक्काचूर झाल्याने पाठीमागील आसनावर बसलेल्या दोघांचे मृतदेह काढण्यासाठी अक्षरशः गॅस कटरच्या साह्याने गाडीचे छत कापावे लागले. 

अपघाताची माहिती मिळताच भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी सहकारी आबा जगताप, रमेश भोसले, श्रीरंग शिंदे, गोरख पवार, तात्या ढवळे, सुनील बालगुडे यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com