पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत झेडपीच्या ७६ शाळा पालिकेच्या ताब्यात देणार

केवळ शाळांच्या इमारती, विद्यार्थी वर्ग होणार : शिक्षक झेडपीकडेच कायम राहणार
 झेडपी शाळा
झेडपी शाळाsakal

पुणे - पुणे महापालिकेत मागील दशकांपासून आजअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने समाविष्ट झालेल्या ४० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या ७६ शाळा येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. पालिकेकडे शाळांच्या इमारती आणि विद्यार्थीच वर्ग केले जाणार असून, या शाळांवर कार्यरत असलेले शिक्षक मात्र जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम ठेवण्यात येणार आहेत. यामुळे झेडपीला अन्य शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ५८६ शिक्षक उपलब्ध होणार आहेत.

पालिकेत समाविष्ट होणाऱ्या शाळांमधील शिक्षकांच्या येत्या मे महिन्यात होणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत नियमानुसार अन्य शाळांवर नियुक्त्या देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (ता.१६) सांगितले. जिल्हा परिषदेने या शाळा महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर पालिका प्रशासन त्यांच्या नियमानुसार नव्याने या शाळांवर शिक्षकांच्या नियुक्त्या करेल, असे मत प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केले.

सद्यःस्थितीत या सर्व शाळांमध्ये मिळून सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर केवळ शाळांच्या इमारती या पालिकेकडे वर्ग होत असतात. मात्र या शाळांवर कार्यरत असलेले केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षक हे जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम राहत असतात. त्यामुळे या समाविष्ट गावांमधील शाळांवर नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी ही पालिकेची असते, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

नियमानुसार शिक्षकांना पालिकेत वर्ग करा - नागरे

दरम्यान, सन १९९९ मधील अध्यादेशानुसार शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी हे सर्वच घटक पालिकेत समाविष्ट करणे अनिवार्य आहे. नियमानुसार तसे बंधन जिल्हा परिषद प्रशासनावर आहे. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे मार्गदर्शनही मागितले होते. त्यावेळी राज्य सरकारने शिक्षक हे पालिकेकडे वर्ग करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा परिषदेला कळविले आहे. तरीही जिल्हा परिषद शिक्षकांना पालिकेच्या सेवेत वर्ग करण्यास नकार देत असल्याचा आरोप सूस जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक ईश्वर नागरे यांनी केला आहे.

समाविष्ट गावे, शाळांची संक्षिप्त माहिती

सन २०१२ पासून पालिकेत समाविष्ट गावे ४०

समाविष्ट गावांतील झेडपी शाळांची संख्या ७६

समाविष्ट गावांतील झेडपी शिक्षकांची संख्या ५८६

या शाळांमधील विद्यार्थी संख्या सुमारे ३० हजार

एकूण शिक्षकांमध्ये केंद्र प्रमुख ०३

मुख्याध्यापकांची संख्या १८

पदवीधर शिक्षक १०४

उपशिक्षक ४६१

आतापर्यंत वर्षनिहाय समाविष्ट गावे, शाळा

२१ नोव्हेंबर २०१२ --- ०४ गावे --- ०९ शाळा

२१ डिसेंबर २०१२ --- १ गाव --- १ शाळा

३१ आक्टोबर २०१३ --- ०१ --- ०१

४ आक्टोबर २०१७ --- ११ --- २०

३० जून २०२१ --- २३ --- ४५

आतापर्यंत एकूण --- ४० --- ७६

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महापालिकेच्या ताब्यात दिल्या जाणार आहेत. या शाळा पालिकेच्या ताब्यात गेल्यानंतर पालिका प्रशासनाकडून या शाळांवर नव्याने शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातील. सध्या या शाळांवर कार्यरत असलेले सर्व शिक्षक जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम राहतील. या सर्वांना येत्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत अन्य शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com