उमेदवारांच्या शपथपत्रांचा गोषवारा मतदान केंद्रांबाहेर लावणार - सहारिया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

पुणे - निवडणुकीतील उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रांचा गोषवारा मतदान केंद्रांबाहेर लावण्याचा, तसेच वृत्तपत्रांमध्ये जाहिरात स्वरूपात छापण्याचा निर्णय राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे जाहीर केला. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यातील दहा नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांपासून होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सहारिया यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने सोळा वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची संपूर्ण माहिती होणे हा मतदारांचा मूलभूत हक्क आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्व उमेदवारांची स्थावर व जंगम मालमत्ता, दायित्वे, शासकीय थकबाकी, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती शपथपत्राद्वारे देण्याची पद्धत सुरू झाली. शपथपत्र अर्धवट भरणाऱ्या उमेदवारांचे अर्जच बाद करण्यात येतात. हे शपथपत्र सूचना फलकावर, तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते; मात्र अनेकदा हे शपथपत्र शोधायचे कुठे आणि कसे याबाबत मतदारांना अडचणी येत होत्या. याबाबतच्या तक्रारी येत असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या शपथपत्राचा गोषवारा वृत्तपत्रांमध्ये छापण्याचा आणि मतदान केंद्रांबाहेर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

सहारिया म्हणाले, 'पुणे जिल्ह्यासह लातूर, नांदेड, नागपूर, गोंदिया येथे होऊ घातलेल्या निवडणुकांपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या शपथपत्रांचा गोषवारा मतदान केंद्रांबाहेर चिटकवण्यात येणार आहे. तसेच त्या भागातील वृत्तपत्रांमध्येही तो छापण्यात येईल. प्रत्येक उमेदवाराची मालमत्ता, गुन्ह्यांची संख्या व अन्य माहिती एका ओळीमध्ये लिहून तो तक्ता वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.''