'संवेदनशील मनाने मनोरुग्णांचा स्वीकार करा'

'संवेदनशील मनाने मनोरुग्णांचा स्वीकार करा'

पुणे - स्किझोफ्रेनिया आजार कोणालाही होऊ शकतो, तो आनुवंशिक आजार नाही. मानसिक रुग्णांना समाज स्वीकारायला तयारच होत नाही. औषधोपचाराने मनोरुग्ण बरे होऊ शकतात. करुणा आणि संवेदनशील मनाने त्यांचा स्वीकार केला पाहिजे, असे आवाहन रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे यंदाचे मानकरी डॉ. भारत वाटवानी यांनी मंगळवारी केले. 

मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर येथील मुख्य सभागृहात पूना सिटीझन डॉक्‍टर्स फोरमच्या (पीडीसीएफ) वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि कृतज्ञतापत्र देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. या वेळी "पीसीडीएफ'चे डॉ. अरुण गद्रे, डॉ. अनंत फडके आदी उपस्थित होते. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे आणि डॉ. शारदा बापट यांनी प्रकट मुलाखत घेतली. 

डॉ. वाटवानी म्हणाले, ""बाबा आमटेंच्या मनोरुग्णांच्या सेवेच्या इच्छेतून मी व माझी पत्नी डॉ. स्मिता, दोघांनी ठरवून मनोरुग्णांसाठी काम करण्याचे ठरवले. बाबांनी अनेकांना त्यांच्या कार्यातून प्रकाशाचे बेट तयार करून दिले. तसेच मदर तेरेसा यांच्यापासून प्रेरित होऊन श्रद्धा सेंटरच्या माध्यमातून सात हजार रुग्णांचे पुनर्वसन करून घरपोच केले असून अद्याप 4 लाख मनोरुग्ण रस्त्यांवर फिरत आहेत. त्यांना समाज अजूनही स्वीकारायला तयार नाही. त्यातून प्रश्‍न जटिल बनत चालले आहेत.'' 

डॉ. आमटे म्हणाले, ""आनंदवन हे फक्त कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी नसून तरुणांना प्रेरित करण्याचे केंद्रदेखील आहे. वाटवानी यांनी बाबांचे मनोरुग्णांसाठी शिल्लक असलेले काम पूर्ण केले आहे. नकारात्मक बातम्यांमध्ये वाटवानींचे काम ही आशादायक बातमी असते.'' 

देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक टक्का म्हणजे एक कोटी लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत; परंतु रस्त्यांवर भटकत असलेल्यांची संख्या 4 लाखांच्या घरात आहे. त्यापैकी पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त असल्याचेदेखील त्यांनी या वेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com