आधी माझ्या बाळाला बघा

योगीराज प्रभुणे
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - ‘आधी माझ्या बाळाला बघा. ते इथेच पडले आहे,’ गर्द अंधारात दहा-पंधरा फूट खोल खड्ड्यातून आर्त स्वरातील हा आवाज आला आणि क्षणार्धात डॉक्‍टरांसह पोलिसांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. एक महिला खड्ड्यात पडल्याचे टॉर्चच्या प्रकाशात दिसले. पण, तिला स्वतःपेक्षाही तिच्या जेमतेम आठ महिन्यांच्या बाळाची अधिक काळजी होती. ती परत-परत म्हणत होती, ‘आधी माझ्या बाळाला बघा.’

पुणे - ‘आधी माझ्या बाळाला बघा. ते इथेच पडले आहे,’ गर्द अंधारात दहा-पंधरा फूट खोल खड्ड्यातून आर्त स्वरातील हा आवाज आला आणि क्षणार्धात डॉक्‍टरांसह पोलिसांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. एक महिला खड्ड्यात पडल्याचे टॉर्चच्या प्रकाशात दिसले. पण, तिला स्वतःपेक्षाही तिच्या जेमतेम आठ महिन्यांच्या बाळाची अधिक काळजी होती. ती परत-परत म्हणत होती, ‘आधी माझ्या बाळाला बघा.’

खंबाटकी घाटात मंगळवारी पहाटे टेम्पोचा भीषण अपघात झाला. ४ वाजून ४७ मिनिटांनी १०८ या आपत्कालीन वैद्यकीय सेवेला या अपघाताची माहिती मिळाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज वैद्यकीय पथक घटनास्थळी पोचले. त्या वेळी पोलिसही आले होते. त्यांची चाहूल लागताच खोल खड्ड्यातून हा आवाज आला. या आईचे नाव आहे रणजिता देवानंद राठोड (वय २६). रोहित हा तिचा आठ महिन्यांच्या मुलाच्या काळजीने तिला पोखरले होते. 

आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील डॉ. संतोष तळेकर यांनी पोलिसांच्या मदतीने रणजिता राठोड यांना खड्ड्यातून वर काढून स्ट्रेचरवर ठेवले. त्या वेळीही त्या म्हणत होत्या. ‘‘माझे बाळ कुठे आहे. आधी त्याला बघा.’’ हे बाळ आईपासून काही अंतरावर पडले होते. आईपाठोपाठ त्यालाही वर काढले. बाळाचा श्‍वास सुरू होता. डॉ. तळेकर यांनी तातडीने त्याची तपासणी केली.

बाळाच्या डोक्‍याला जखम झाली होती. पण, ते शुद्धीत होते. दोघांनाही स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत बसविले. बाळाला पाहता क्षणी त्या आईने बाळाला कवटाळले. त्या वेळी आईच्या दोन्ही पायांना आणि डोक्‍याला झालेल्या जखमांच्या वेदनांचाही तिला विसर पडला. घटनास्थळावरून आई आणि बाळ या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. 
याबाबत डॉ. तळेकर म्हणाले, ‘‘रुग्णवाहिकेतही आईने बाळाला कवटाळून घेतले होते. ती आई बाळाला काही झालंय का, त्याला कुठे लागले आहे का, हे विचारत होती.’’

बीव्हीजीच्या १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’ डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके म्हणाले, ‘‘अपघाताची माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटांमध्ये पाच रुग्णवाहिका घटनास्थळी पोचल्या. शिरवळ, खंडाळा आणि वाई येथून या रुग्णवाहिका रवाना झाल्या होत्या. रुग्णवाहिकेतील डॉक्‍टरांनी १२ रुग्णांना जागेवर प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.’’

Web Title: accident khambataki ghat women child