भरधाव मोटारीने पाच जणांना उडवले

भरधाव मोटारीने पाच जणांना उडवले

बालिकेचा मृत्यू; चार जण गंभीर, महिला मोटारचालकाविरुद्ध गुन्हा 

पुणे/औंध - महिला चालकाचे भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या पाच जणांना मोटारीने उडवले. मनाचा थरकाप उडविणाऱ्या या भीषण अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू झाला; तर अन्य चौघे जण गंभीर जखमी झाले असून, एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बाणेर गावठाण प्रवेशद्वाराजवळ सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.

ईशा अजयकुमार विश्वकर्मा (वय ३) असे मृत मुलीचे नाव आहे, तर साजिद साहिल शेख (वय ४) याची प्रकृती चिंताजनक आहे. पूजा अजयकुमार विश्वकर्मा (वय २४), सय्यद साजिद अली (वय २५) आणि निशा साजिद शेख (सर्व रा. धनकुडे हाईट्‌स, बाणेर) अशी अन्य गंभीर जखमींची नावे आहेत. या तिघांवर औंध येथील मेडीपॉइंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मोटारचालक महिलाही किरकोळ जखमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सुजाता जयप्रकाश श्रॉफ (वय ५४) असे संशयित चालक महिलेचे नाव असून, पती बांधकाम व्यावसायिक आहेत. 

विश्वकर्मा आणि शेख कुटुंबीय हे बाणेर येथील धनकुडे हाईट्‌स या एकाच इमारतीमध्ये राहतात. विश्वकर्मा यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. दोन्ही कुटुंबीय मुलांसमवेत डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेले होते. खरेदीनंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते बाणेर गावठाण प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ रस्ता ओलांडण्यासाठी उभे होते. त्या वेळी भरधाव आलेली आयटेन मोटार थेट दुभाजकावर चढली. तेथे थांबलेल्या पाच जणांना जोरात धडक देऊन फरफटत नेले. त्यानंतर मोटार पुढे खांबाला धडकून थांबली. 
अपघातानंतर तेथील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलविले. त्यापैकी ईशा विश्वकर्मा हिला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. साजिद शेख हा अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज
बाणेर रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या अपघाताचे फुटेज व्हायरल झाले. विश्‍वकर्मा आणि शेख कुटुंबीयांनी अर्धा रस्ता ओलांडला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वाहने येत असल्यामुळे ते दुभाजकाजवळच थांबून होते. त्या वेळी अचानक आलेल्या भरधाव मोटारीने या पाच जणांना उडविले. हे दृश्‍य मनाचा थरकाप उडविणारे होते. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिला चालकाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com