तीन स्टॉल्सवर कारवाई 

यशपाल सोनकांबळे 
बुधवार, 15 मार्च 2017

पुणे - शॉप ऍक्‍ट आणि लेबर कॉन्ट्रॅक्‍ट लायसन्स काढण्यासाठी कामगार आयुक्तालयाच्या आवारात आणि प्रवेशद्वाराजवळील अनधिकृत स्टॉल्समधून एजंटगिरी सुरू असल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले होते. त्याची गंभीर दखल घेत कामगार आयुक्त कार्यालयाकडून पोलिस आयुक्तालय आणि महापालिका प्रशासनाला अनधिकृत स्टॉल्स तसेच एजंटगिरीवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात पत्र देण्यात आले. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून आज तीन अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. 

पुणे - शॉप ऍक्‍ट आणि लेबर कॉन्ट्रॅक्‍ट लायसन्स काढण्यासाठी कामगार आयुक्तालयाच्या आवारात आणि प्रवेशद्वाराजवळील अनधिकृत स्टॉल्समधून एजंटगिरी सुरू असल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले होते. त्याची गंभीर दखल घेत कामगार आयुक्त कार्यालयाकडून पोलिस आयुक्तालय आणि महापालिका प्रशासनाला अनधिकृत स्टॉल्स तसेच एजंटगिरीवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात पत्र देण्यात आले. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून आज तीन अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. 

या संदर्भात कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत अप्पर कामगार आयुक्त ब. रा. देशमुख, सहाय्यक कामगार आयुक्त नि. अ. वाळके, आमदार विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवे आणि अधिकारी उपस्थित होते. यामध्ये अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई केल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी स्वतंत्र चौकशी कक्ष व तक्रार निवारण कक्षही स्थापन केले असून तेथे तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली. 

ऑनलाइन फॉर्म भरून दिल्यास विहीत मुदतीत परवाने दिले जातील. परंतु, संकेतस्थळावर क्‍लिष्ट माहिती भरणे, कागदपत्रे अपलोड करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे त्रस्त नागरिक एजंटांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्याला आळा घालणे तसेच नागरिकांत जागृतीसाठी विविध उपाययोजना कामगार आयुक्तालयाकडून अमलात आणल्या जाणार आहेत. 

नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे. तांत्रिक माहिती देण्यासाठी आणि तक्रार नोंदविण्यासाठी दोन स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी स्वतः किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावे. अनोळखी व्यक्तींसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये. कोणतीही तांत्रिक अडचण किंवा तक्रार असल्यास थेट कामगार आयुक्तालयातील चौकशी व तक्रार कक्षातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. नागरिकांच्या सतर्कता व सहकार्याने एजंटगिरीला चाप बसेल असा मला विश्‍वास आहे. 
- ब. रा. देशमुख, अप्पर कामगार आयुक्त, पुणे 

शॉप ऍक्‍ट लायसन्स काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया आहे. त्यामध्ये आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची यादी, प्रतिवर्ष आकारण्यात आलेले दर, ऑनलाइन पेमेंट कसे करावे याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अर्जासंदर्भात संबंधित नागरिकांनी या कक्षाशी संपर्क साधावा. तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या किंवा त्रास होत असेल तर त्यांनी कामगार आयुक्तालयातील तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवावी. 
- नि. अ. वाळके, सहाय्यक कामगार आयुक्त, शॉप ऍक्‍ट विभागप्रमुख 

खासगी कंपन्यांनाही देणार माहिती 
शॉप ऍक्‍ट व लेबर कॉन्ट्रॅक्‍ट लायसन्स काढून देण्यासाठी ऑनलाइन सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांना कामगार आयुक्तालयाचे अधिकृत दूरध्वनी क्रमांक व संबंधित विभागप्रमुखांची नावे देण्यात येणार आहेत. तसेच या लायसन्ससाठी अनोळखी व्यक्ती व संस्थांची नावे, दूरध्वनी क्रमांक देऊ नयेत, असे लेखी पत्र सर्व खासगी कंपन्यांना देण्यात येणार असल्याचे अप्पर कामगार आयुक्त देशमुख यांनी सांगितले. 

Web Title: Action on the three stalls