आघाडी न झाल्याने फटका

आघाडी न झाल्याने फटका

वानवडी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधून महापौर प्रशांत जगताप आणि त्यांच्या मातुःश्री रत्नप्रभा जगताप हे दोघेच विजयी झाले. तेही पाच हजारांहून अधिक मतांच्या फरकाने. उर्वरित दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. राष्ट्रवादीचे दिलीप जांभूळकर यांनी भाजपचे धनराज घोगरे यांना कडवी लढत दिली. महापौर जगताप यांनी त्यांच्या या प्रभागात राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनेल निवडून आणण्याचे आव्हान स्वीकारले होते. मात्र, त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असती, तर आघाडीच्या उमेदवारांना फायदा झाला असता, हे मात्र नक्‍की.

‘अ’ गट (मागासवर्ग प्रवर्ग) -
वानवडी प्रभागातील अ गटातून भाजपचे धनराज घोगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप जांभूळकर यांच्यात चुरशीची लढत झाली. शेवटच्या, सहाव्या फेरीअखेर घोगरे हे साधारण साडेतीनशे मतांच्या फरकांनी विजयी झाले. काँग्रेसचे साहिल केदारी यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे मकरंद केदारी यांना १२८३ मते मिळाली, तर अन्य तीन उमेदवारांना पाचशे मतांचा टप्पाही गाठता आला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील केदारी यांना ४०५, रवींद्र जांभूळकर यांना २४२ आणि अपक्ष सोनाली शिवरकर यांना १५९ मते मिळाली. 

‘ब’ गट (सर्वसाधारण महिला) -
काँग्रेसकडून सविता गिरमे, राष्ट्रवादीकडून कांचन जाधव, शिवसेनेच्या स्वाती जगताप आणि भाजपकडून कालिंदा पुंडे निवडणुकीच्या मैदानात होत्या. या गटातून पुंडे दहा हजार १११ मते मिळवून विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या कांचन जाधव आठ हजार १५४ मते घेऊन दुसऱ्या, काँग्रेसच्या सविता गिरमे सहा हजार मते घेऊन तिसऱ्या, तर शिवसेनेच्या जगताप चौथ्या स्थानावर राहिल्या. या ठिकाणी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असती, तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता, हे नाकारता येणार नाही.

‘क’ गट (सर्वसाधारण महिला) -
शिवसेनेच्या ॲड. धनश्री बोराडे, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, काँग्रेसकडून रेखा जांभूळकर आणि भाजपकडून कोमल शेंडकर यांनी निवडणूक लढविली. त्यात रत्नप्रभा जगताप यांनी पाच हजारांहून अधिक मताधिक्‍याने विजय मिळविला. भाजपच्या शेंडकर दुसऱ्या स्थानावर, तर काँग्रेसच्या रेखा जांभूळकर तिसऱ्या स्थानावर राहिल्या.

‘ड’ गट (सर्वसाधारण) -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि भाजपचे दिनेश ऊर्फ प्रसाद नामदेव होले यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित शिवरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; परंतु त्यांचा अर्ज अपात्र ठरल्यामुळे जगताप यांच्याविरुद्ध प्रबळ उमेदवारच नव्हता. तरीही जगताप यांनी राजकीय डावपेच टाकत आणि गाफील न राहता अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होले यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मनसेचे अतुल वानवडीकर यांना ५११, तर शिवसेनेचे प्रवीण येसादे यांना १००१ मते मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com