जीवनाच्या निरोपानंतरही अवयवदानाच्या रुपाने मागे राहू शकता : डॉ. अमृता देवगांवकर 

organ-donation.jpg
organ-donation.jpg

सासवड : "जीवनाचा निरोप घेत असतानाही आपले जीवन काही अंशी अवयवदानाच्या रुपाने पुढे सुरु राहू शकते. त्यामुळे माणसांनी हे महत्व अोळखून अवयवदानात सहभागी व्हावे. इतरांत ही जागृती केली पाहिजे. त्यातून एक माणुस किमान आठ व्यक्तींना अवयवदानाचा लाभ देऊ शकतो." , असे प्रतिपादन पुण्यातील गांधीभवन येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. अमृता देवगांवकर यांनी केले. 

महाराष्ट्र सहकार परीषदेचे माजी अध्यक्ष कै. चंदुकाका जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात पुरंदर रोटरी क्लबतर्फे `अवयवदान - जीवनदान` अभियानाचा शुभारंभ झाला. त्यावेळी डाॅ. देवगांवकर बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रवीण जगताप, डॉ. दीपक जगताप, युवराज वारघडे, डॉ. सुमित काकडे, डॉ. प्रतिभा बांदेकर, डॉ. अमोल हेंद्रे, चंद्रकांत हिवरकर, प्रल्हाद कवाडे, संजय जाळींद्रे, दत्तात्रय गवळी आदींसह नागरीक उपस्थित होते. यानिमित्ताने सुमारे २०३ नागरिकांनी स्वतःचे अवयवदानाचे फॉर्म भरून दिले. पुरंदर रोटरी क्लबने हे फॉर्म डॉ. देवगांवकर यांच्याकडे सुपूर्त केले. 

नऊ ऑगस्टपर्यंत पुरंदर तालुक्यामध्ये अवयवदानाबाबत जनजागृती सुरु राहणार असल्याचे. , जनजगृती अभियानाचे प्रकल्प संचालक अनिल उरवणे यांनी सांगितले. यानिमित्ताने डॉ. देवगांवकर यांनी अवयवदान व येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. जगताप यांनी नेत्रदान करण्याचे महत्व पटवून दिले. तसेच याबाबतची संपूर्ण माहिती देताना उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. डाॅ. देवगांवकर म्हणाल्या, "अवयवदान हे मानवांसाठी वरदान आणि सर्वश्रेष्ठ दान असून एका माणसाच्या अवयवदानामुळे आठ व्यक्तींना जीवदान मिळते तर एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोघांना दुष्टी मिळते. त्यामुळे अवयवदानाबाबत जनजागृती पुढे न्या."

प्रारंभी कै. चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्वानंद लोमटे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राचार्य नंदकुमार सागर यांनी अवयवदानाची शपथ देऊन आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com