''मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा तीव्र''

 ''मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा तीव्र''

बारामती : मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा तीव्र करण्याचा निर्णय आज बारामतीतील बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीची महत्वपूर्ण बैठक आज (रविवारी) बारामतीच्या बांधकाम विश्रामगृहात पार पडली. महाराष्ट्रातुन आरक्षण कृती समितीचे अनेक सदस्य या बैठकीस उपस्थित होते. 

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. धनगर समाज आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. या बैठकीत सर्वच सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पुढील काळात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचे यात ठरविण्यात आले. या आंदोलनात एकसूत्रीपणा असावा या उद्देशाने येत्या रविवारी (ता. 5) पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्याचेही निश्चित करण्यात आले. राज्यभरातील सर्व सामाजिक संघटना, विविध पक्षातील समाजाचे नेते व समाजाचे दोन्ही मंत्री, खासदार, आजी माजी आमदार व कृती समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांची व्यापक बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

येत्या रविवारपासून धनगर समाज आरक्षणाचा निर्णायक लढा सुरु करणार असुन चार वर्षे संयमाने या वेगवेगळ्या घडामोडी पाहत असताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीम्हणून समाजातील तरुणांनमध्ये असंतोष पसरत असल्याचे विश्वास देवकाते पाटील यांनी जाहीर केले.

आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत या बैठकीत गंभीर चर्चा करण्यात आली. कृती समितीचे सदस्य मदनराव देवकाते,  विलासराव वाघमोडे, प्रा शिवाजीराव बंडगर, बजरंग खटके, बाळासाहेब करगळ, परमेश्वर कोळेकर, प्रा जयंत बगाडे, विठ्ठल पाटील,  शिवाजीराव इजगूडे,  दादासाहेब काळे, पांडुरंग घरगुडे, बाळासाहेब बंडगर, बजरंग गावडे, दिगंबर लवटे, अमोल मदने, निखिल खटके उपस्थित होते, कृती समितीचे सचिव गणपत देवकाते यांनी प्रास्ताविक केले व किशोर मासाळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com