प्रदूषणमुक्तीच्या दिशेने "स्मार्ट' पाऊल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पुणे - वाढत्या वाहनसंख्येमुळे शहराची प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शनिपार चौकात जनता सहकारी बॅंकेजवळ बसविलेल्या हवा प्रदूषण नियंत्रक यंत्रणेचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते शनिवारी उद्‌घाटन झाले.

पुणे - वाढत्या वाहनसंख्येमुळे शहराची प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शनिपार चौकात जनता सहकारी बॅंकेजवळ बसविलेल्या हवा प्रदूषण नियंत्रक यंत्रणेचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते शनिवारी उद्‌घाटन झाले.

अमोल चाफेकर यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे. या वेळी टिळक म्हणाल्या, 'दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रक बसविणे, ही येत्या काळाची गरज आहे. नागरिकांना रोज प्रदूषणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रदूषण कमी करणारी ही यंत्रणा रहदारीच्या ठिकाणी बसविल्यास ती नागरिकांच्या फायद्याची ठरेल.''

चाफेकर म्हणाले, 'ही यंत्रणा प्रदूषण आटोक्‍यात आणण्याबरोबरच परिसरात शुद्ध हवा उपलब्ध करून देणे, अशा दुहेरी पातळीवर ही यंत्रणा काम करेल. मानवी आरोग्यास हानिकारक असलेले 25 ते 50 मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण या उपकरणातील फिल्टरद्वारे शोषून परिसरातील शुद्ध हवा होते. या यंत्रणेची देखभाल आमच्या गॅंब्रील कंपनीमार्फत मोफत केली जाईल.''

पुण्यात दोन हजार प्रदूषण नियंत्रक
पुण्यातील पहिली यंत्रणा नळ स्टॉप येथे कार्यरत आहे. येत्या काळात शहरात दोन हजार प्रदूषण नियंत्रके बसविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये, आयटी पार्क, बॅंक, रुग्णालयांच्या परिसरात ही उपकरणे बसविण्यात येणार आहेत; तसेच संपूर्ण देशात 1 लाख प्रदूषण नियंत्रक बसविण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे चाफेकर यांनी सांगितले.