"तिहेरी तलाक' पद्धत चुकीचीच 

"तिहेरी तलाक' पद्धत चुकीचीच 

पुणे - "" मुस्लिम महिलांना पुरुषी वर्चस्वातून मुक्त करण्याचे प्रयत्न वेळोवेळी अनेक देशांत होत आले आहेत. तीन वेळा तोंडी तलाक दिल्यामुळे मुस्लिम महिलांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होऊ नये, यासाठी पाकिस्तान, तुर्की, इराण या मुस्लिम राष्ट्रांतील मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करून "तिहेरी तलाक'ची चुकीची प्रथा रोखण्यावर काही महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. भारतातही ही प्रथा थांबावी, यासाठी समाजाने ठाम निश्‍चयाने पुढे यावे,'' अशी अपेक्षा पाकिस्तानी लेखक, संपादक अजमल कमाल यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (ता. 3) "दलवाईंचे लेखन व कार्य' या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र "साधना साप्ताहिक' व "हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट'ने आयोजिले आहे. या चर्चासत्रात कमाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दलवाईंच्या "इंधन' कादंबरीचा अनुवाद त्यांनी उर्दू भाषेत केला असून, तो पाकिस्तानात प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या या पुणे भेटीनिमित्त "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. 

कमाल म्हणाले, ""वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रथा चटकन बंद होणे हे कुठल्याही कर्मठ समाजाला मान्य नसतेच. अनेकदा त्यामागे धर्मसत्तेच्या नावाखाली असणारे राजकीय हेतूही असतात. पाकिस्तानातही तिहेरी तलाकबंदीचा कायदा कागदोपत्री लागू झाला असला तरीही, प्रत्यक्षात आजही तिथल्या महिलांपुढील तलाकचा प्रश्‍न पूर्णतः संपलेला नाहीच. प्रगती करू पाहणाऱ्या समाजाला मागे ओढण्याचे प्रयत्न तिथेही होत आहेतच. मात्र, तलाक बंदीच्या कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या हाती बळ आले हे नक्की ! त्यांनी आपला आवाज न्यायसंस्थेपुढे पोचवायला सुरवात नक्कीच केली. समाजसुधारणेचे हे एक पुढे जाऊ पाहणारे पाऊल होते.'' 

भारतात मुस्लिम समाजातील महिलांसाठी हमीद दलवाई यांनी केलेले कार्य भरीव असेच म्हणायला हवे. त्यांचे कार्य आजही तेवढेच आवश्‍यक असून, त्यांना अपेक्षित असणाऱ्या सुधारणा राबविण्यातून मुस्लिम समाजात सकारात्मक बदलच घडणार आहेत, असेही ते म्हणाले. 

कोण आहेत अजमल कमाल? 
फाळणीनंतर कमाल यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातून पाकिस्तानातील कराची येथे स्थलांतरित झाले. शिक्षणाने अभियंता असणारे कमाल हे गेली 28 वर्षे कराची येथून "आज' हे अनुवाद आणि कवितांना वाहिलेले त्रैमासिक चालवतात. त्यांची पत्नी गौरी पटवर्धन या चित्रपट दिग्दर्शक आणि मूळच्या पुणेकर व मराठी असून, त्यांनी आपले शिक्षण "एफटीआयआय'मधून घेतले आहे. कमाल हे पाकिस्तानात वाचनसंस्कृती रुजवणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक आहेत. 

चर्चासत्रात आज 
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले "भारतीय संविधानाची धर्मासंबंधीची भूमिका' या विषयावर बोलतील, तर लेखक विनय हर्डीकर दलवाईंच्या "मुस्लिम पॉलिटिक्‍स इन इंडिया' या पुस्तकावर बोलणार आहेत. शिवाय अब्दुल कादर मुकादम, सय्यदभाई, रझिया पटेल, शमसुद्दीन तांबोळी, अन्वर राजन आदींचीही व्याख्याने आहेत. एस. एम. जोशी सभागृहात सकाळी 10 ते 4 या वेळेत ते अनुभवता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com