टॉक शो अन्‌ ‘शोध युवा प्रतिभेचा’

टॉक शो अन्‌ ‘शोध युवा प्रतिभेचा’

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक ढाच्यात बदल करून साहित्य महामंडळाने यंदा ‘टॉक शो’, ‘कवी, कविता, काव्यानुभव’, ‘शोध युवा प्रतिभेचा’, ‘नवोदित लेखक मेळावा’, ‘बाल-कुमार मेळावा’, ‘विचार जागर’, ‘प्रतिभायन’, ‘नवे लेखक, नवे लेखन’, ‘बोलीतील कथा’ असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचे संमेलन वेगळे ठरणार आहे.

डोंबिवली येथे ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान संमेलन होणार आहे. त्याची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली. संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी ध्वजवंदन करतील. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता संमेलनाचा उद्‌घाटन सोहळा होणार आहे. यासाठी कोण-कोणते मान्यवर येणार आहेत, हे महामंडळातर्फे लवकरच जाहीर होईल. सुखदेव ढाणके यांच्या अध्यक्षतेखालील कवी संमेलनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (ता. ४) ‘साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व’ या विषयावर ‘टॉक शो’ होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम संमेलनात प्रथमच होणार असून यात ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले, ‘साम वाहिनी’चे संपादक संजय आवटे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे, प्रकाश एदलाबादकर, अरुण म्हात्रे, उदय निरगुडकर सहभागी होणार आहेत. भानू काळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्षीय भाषणावर चर्चा, अनिल बोकील यांच्या अध्यक्षतेखाली ‘बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन व मराठी लेखन’ हा परिसंवाद, साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या उपस्थितीत बालमेळावा, दिलीप प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले?’ हा परिसंवाद, दत्तात्रेय म्हैसकर यांची मुलाखत, नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता’ हा परिसंवाद होणार आहे.

संमेलनाच्या तिसऱ्या दिवसाची (ता. ५) सुरवात ‘आम्ही मराठीचे मारेकरी’ या परिसंवादाने होणार आहे. यात डॉ. सुधीर रसाळ यांच्याबरोबरच अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. हरिश्‍चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी समीक्षेची समीक्षा’, विविध क्षेत्रांतील महिलांवर ‘प्रतिभायन’, सुधीर जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘विविध साहित्य प्रवाहांची सद्य:स्थिती’ ही चर्चा होणार आहे. अहिराणी, झाडीबोली, मराठवाडी, कोल्हापुरी, मिश्र, मालवणी या बोली भाषेत कथाकथन, कविसंमेलन, कांचन सोनटक्के यांची मुलाखत, कविकट्ट्यावरील कविता असे कार्यक्रम सादर होणार आहेत.
 

ज्येष्ठ आणि नवोदितांचे कार्यक्रम 
प्रभा गणोरकर, अशोक नायगावकर, संदीप खरे, श्रीकांत देशमुख यांचा ‘कवी, कविता, काव्यानुभव’ हा कार्यक्रम होणार आहे. नवोदित लेखकांच्या मेळाव्यात ‘नवोदितांचे लेखन’ या विषयावर चर्चा होणार असून यात मनस्विनी लता रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे, तर ‘नवे लेखक : नवे लेखन’ या चर्चेत अमृता सुभाष, आशुतोष जावडेकर, अरुंधती वैद्य बोलणार आहेत. अनिकेत आमटे यांच्यासह दहा युवकांचा ‘आम्हालाही काही सांगायचे आहे’ या कार्यक्रमाबरोबरच ‘विचार जागर’, ‘युद्धस्थ कथा’, ‘आंतर-भारती’ असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com