जखमींची अल्कोहोल तपासणी! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

ससून रुग्णालयात अल्कोहोलची क्‍लिनिकली तपासणी केली जाते. रुग्णाच्या रक्तातील अल्कोहोलची चाचणी करण्यासाठी रक्ताचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविले जातात.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

पुणे - अपघातातील प्रत्येक जखमी रुग्णाच्या रक्तातील अल्कोहोलची तपासणी करण्याचा फतवा काही वैद्यकीय विमा कंपन्यांनी काढला आहे, तर काही विमा कंपन्यांनी त्याही पुढे जाऊन फक्त जेनेरिक औषधांचेच पैसे रुग्णाला देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी वैद्यकीय विमा कंपन्यांनी शहरातील रुग्णालयांशी दर करार केला नसल्याने ६८ रुग्णालयांमधील ‘कॅशलेस’ आरोग्य सेवा बंद झाली असतानाच आता खासगी वैद्यकीय विमा कंपन्यांनी ग्राहकांवर नवे नियम आणि अटी लादण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे. 

अपघातग्रस्त रुग्ण असो, की संशयास्पदरीत्या पडून जखमी झालेला रुग्ण यांच्या रक्तातील अल्कोहोलची तपासणी करणे रुग्णालयांना बंधनकारक केले आहे. त्या आशयाचा फतवा काही खासगी वैद्यकीय विमा कंपन्यांनी त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांना पाठविला आहे. उपचारांसाठी दाखल झालेल्या अपघातग्रस्त रुग्णाची वैद्यकीय विम्याच्या पूर्वपडताळणीच्या कागदपत्रांबरोबरच रक्तातील अल्कोहोलच्या चाचण्यांचे अहवाल जोडण्याची सक्ती रुग्णालयांवर केली आहे. अन्यथा त्या बाबतची विचारणा रुग्णालयांना करण्यात येईल, असे विमा कंपन्यांनी रुग्णालयांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

रक्तातील अल्कोहोल चाचणी करणार कशी?
वैद्यकीय विमा कंपन्यांनी रक्तातील अल्कोहोलची चाचणी करण्याची सक्ती केली असली तरीही ही चाचणी पुण्यातील प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ही चाचणी करणार तरी कशी, असा सवाल रुग्णालयांनी उपस्थित केला आहे. शहरातील ससून रुग्णालयासह प्रमुख प्रयोगशाळांमधून ही चाचणी होत नसल्याची माहिती मिळाली.

जेनेरिकच वापरा
जेनेरिकचाच वापर करण्याचे आदेश भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) डॉक्‍टरांना दिले आहेत. त्यामुळे काही वैद्यकीय विमा कंपन्यांनीही जेनेरिक औषधांचेच पैसे रुग्णांना देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्या बाबतचे पत्र विमा कंपन्यांनी रुग्णालयांनाही पाठविले आहे. 

रक्तातील अल्कोहोलच्या चाचण्यांचे अहवाल मागविणे हे अपघातातील रुग्णांवर अन्यायकारक आहे. या चाचण्या पुण्यात होत नाहीत, जिथे होतात तिथून त्याचे अहवाल यायला वेळ लागणार. तो पर्यंत उपचाराचे काय करायचे, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांच्या रोषाला रुग्णालय आणि डॉक्‍टरांना सामोरे जावे लागते.
- डॉ. नितीन भगली, अस्थिरोगतज्ज्ञ

रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडतानाच्या कागदपत्रांवर जेनेरिक औषधांची नावे बंधनकारक आहेत. 
रुग्णाला ब्रॅंडेड औषधे दिल्यास त्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाने करावे, असाही या पत्रात ठळक उल्लेख आहे.