'तीन महिन्यांत सर्व बस मार्गांवर आणणार'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंढे म्हणतात
मार्गांचे सुसूत्रीकरण करताना हस्तक्षेप खपवून घेणार नाही  
बंद बस प्राधान्याने रस्त्यावर आणणार, मगच नव्या बसचा विचार 
पीएमपीमध्ये मनुष्यबळ मुळात जास्त आहे
उपलब्ध साधनसामग्रीतून चांगली सेवा देणार
प्रवाशांना पुरेशा, स्वच्छ व वेळेवर बस सेवा देणार
प्रशासनात शिस्त निर्माण करणार 
पीएमपी पहिल्या टप्प्यात किमान ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर धावू शकेल

पुणे - पीएमपीमध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी केवळ पैशांची गरज नाही, तर प्रशासनात शिस्त निर्माण केली आणि व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झाल्यास ही कंपनी मार्गावर येऊ शकेल. आगामी तीन दिवसांत २७ बस, तर तीन महिन्यांत ताफ्यातील सर्वच्या सर्व २०५० बस रस्त्यावर आणायचा प्रयत्न असेल, असे मत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. 

‘सकाळ’ला मुलाखत देताना मुंढे यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठीच्या उपाययोजना, नजीकच्या काळात कोणत्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अल्पावधीतील आणि दूरगामी उपाययोजना कशा हव्यात, आदींची माहिती दिली. पीएमपीच्या समस्या या कधीच सुटणार नाहीत, अशा दर्जाच्या नाहीत. त्या समस्या सोडविणे शक्‍य आहे. त्यासाठी प्रशासनात शिस्त हवी आणि गैरव्यवस्थापन दूर करणे गरजेचे आहे. त्या दिशेने प्रयत्न सुरू असून, त्याची अनुभूती पुणेकरांना लवकरच येईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. पीएमपी कधीच नफ्यात येऊ शकत नाही, हा गैरसमज आहे. 

मार्गांचे सुसूत्रीकरण, सुट्या भागांतील अव्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापनातील गफलत, निश्‍चित उद्दिष्टाचा अभाव आदी विविध कारणांमुळे पीएमपीची परिस्थिती गंभीर झाली होती. कोणत्याही संस्थेचे कामकाज मागणीनुसार पुरवठा, असे हवे. मात्र, पीएमपीत उलट परिस्थिती दिसते. त्यात बदल करण्यासाठी आता तातडीने पावले टाकण्यात येत आहेत अन्‌ समाधानाची बाब म्हणजे काही प्रमाणात का होईना, बदल दिसू लागले आहेत, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले. शहरात मेट्रोला पूरक बससेवा निर्माण करणार आहे. खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी ‘बीआरटी’ जगभर यशस्वी झाली आहे. पुणे आणि पिंपरीतही तिचा विस्तार करणार आहे. एका बसमागे ६.५ कर्मचारी संख्या आवश्‍यक आहे. पीएमपीच्या १२०० बस आहेत. त्यामुळे ७२०० कर्मचारी हवेत. प्रत्यक्षात येथे १० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुणेकरांनो, तीन महिन्यांत चित्र पालटेल 
पीएमपीमध्ये सुमारे २०५० बस आहेत. त्यातील ४०० ते ४५० बस बंद आहेत. मात्र, एका महिन्यांत त्यातील २००, तर तीन महिन्यांत एकूण २०५० बस रस्त्यावर आणायचा प्रयत्न असेल. आगामी तीन दिवसांत २७ बस रस्त्यावर आणण्यात येतील, तर गेल्या आठवड्यात झालेल्या प्रयत्नांमुळे रस्त्यावरील बसची संख्या सुमारे १०० ने वाढली असून, सध्या १५५० हून अधिक बस मार्गांवर आहेत. एक बस सध्या १५० किलोमीटर, तर खासगी बस २५० किलोमीटर प्रतिदिन धावते. पीएमपीच्या बंद बसची दुरुस्ती करून त्या मार्गावर आल्यावर त्यांचे प्रतिदिन ‘रनिंग’ वाढले तर प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील. त्यामुळे पीएमपीच्या सर्वच बसचे रनिंग २५ टक्‍क्‍यांनी वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: all bus routes to bring in three month