सर्व वैद्यकीय सेवा आज बंद राहणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्‍टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्‍टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी शनिवारी (ता. 18) शहरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी शुक्रवारी दिली. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी नऊ वाजता मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

डॉक्‍टरांवरील हल्ल्यांमुळे रुग्णांना सेवा देणे अशक्‍य होईल. डॉक्‍टरांना सुरक्षित वातावरणात वैद्यकीय सेवा करता यावी, यासाठी डॉक्‍टर, रुग्णालये संरक्षण कायदा तयार केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ही अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, यासाठी शहरातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 30 संघटनांनी एकत्र येऊन "मेडिकल प्रोटेक्‍शन फोरम' सुरू केले आहे. त्या अंतर्गत शहरातील सर्व वैद्यकीय सेवा शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व डॉक्‍टरांचे दवाखाने, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर्स बंद राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असून, पॅथॉलॉजिस्ट संघटनेने शनिवारी "नो सॅम्पल डे' जाहीर केला आहे. तसेच, रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. प्रकाश मराठे म्हणाले, ""पुण्याच्या विविध भागांतील आणि शाखांच्या डॉक्‍टरांच्या संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या संपाला हॉस्पिटल असोसिएशन, औषध विक्रेत्यांच्या संघटनेने प्रतिसाद दिला आहे.'' 

सोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन या सुविधाही शनिवारी बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या वेळी डॉ. आरती निमकर, डॉ. अविनाश भूतकर, डॉ. पद्मा अय्यर, डॉ. संजय पाटील यांच्यासह वेगवेगळ्या वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

आपत्कालीन सेवा उपलब्ध 
"महाराष्ट्र मेडिकल टीचर्स असोसिएशन'ने काळ्या फिती लावून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता हे यात सहभागी होणार आहेत. मात्र, ससून रुग्णालय आणि महापालिकांच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा नियमित सुरू राहणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी ससून रुग्णालयाच्या 020- 26128000 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: All medical services will be closed today