युती विभाजनाचा राष्ट्रवादी लाभ उठविणार?

युती विभाजनाचा राष्ट्रवादी लाभ उठविणार?

पिंपरी - मुंबईसह राज्यातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर युती न करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांपेक्षा थेट फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होऊ शकतो; परंतु या पक्षाला सध्या लागलेली गळती पाहता या संधीचा त्यांना कितपत लाभ उठवता येईल, याबद्दल राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात यंदा प्रथमच सार्वत्रिक निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरताना दिसतील. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत भाजप-शिवसेना एकत्र लढत; मात्र या वेळी प्रथमच दोन्ही पक्ष आमने-सामने लढताना दिसतील. त्यामुळे युतीच्या मतांमध्ये थेट विभाजन होणार आहे. 128 पैकी गेल्या वेळी शिवसेनेला 14, तर भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. या 17 नगरसेवकांपैकी अनेक जण अगदी कमी मताधिक्‍क्‍याने विजयी झाले होते. त्यामुळे मत विभाजनाचा फटका शिवसेनेला आणि त्याखालोखाल भाजपला काही प्रमाणात बसू शकतो.

युती तुटल्याने मतांचे विभाजन होणार असले, तरी या वेळी कधी नव्हे ते भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे. युती असती तर महापालिकेच्या सत्तेचा मार्ग सुकर झाला असता; पण आता या दोन उमेदवारांच्या भांडणात राष्ट्रवादीला आपसूक फायदा होणार आहे. ही परिस्थिती
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर असली, तरी आता राष्ट्रवादीकडे या वेळी अजित पवार हे एकमेव स्टार प्रचारक आहेत. स्थानिक पातळीवर पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे एकही बडा नेता राहिलेला नाही.

शिवाय उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली, तरी पक्षाची पडझड अद्याप सुरूच आहे. एकेक नगरसेवक पक्षातून बाहेर पडत आहे. त्याचे जनतेत जाणारे संकेत पक्षावर विपरीत परिणाम करू शकतात. त्यामुळे युती तुटल्याच्या संधीचा ते किती लाभ उठवतील याबद्दल शंका आहे. भोसरीत विलास लांडे राष्ट्रवादीकडे असले, तरी त्यांना भाजपचे आमदार महेश लांडगे ताकदीने तोंड देऊ शकतात. या सर्व परिस्थितीचा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो.

शिवसेना दहा टक्के मते गमावणार
भाजप व शिवसेना हे दोन्ही केडरबेस पक्ष आहेत. त्यांचे स्वतःचे मतदान आहेत. त्याव्यतिरिक्त नोकरदार किंवा पांढरपेशी वर्गाचे मतदान व्यक्तिसापेक्ष असते. युतीच्या विभाजनामुळे शिवसेनेला या दहा टक्के मतांचा फटका सरळ बसू शकतो. त्यामुळे शिवसेनेला जितक्‍या जागा मिळणे अपेक्षित आहे, तितक्‍या त्या मिळणे कठीण दिसते. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा विरोधात बसण्याची वेळ येऊ शकते; मात्र सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे असतील.

भाजपला मोठा पक्ष होण्याची संधी
युती तुटल्याने भाजपवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीतून आलेल्या बड्या नेत्यांची मांदियाळी भाजपकडे आहे. शिवाय जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी या पक्षाकडे आहे. इतर पक्षांतील काही नेत्यांशी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या मदतीनेदेखील भाजपची ताकद निश्‍चित वाढणार आहे. सत्तेपर्यंत पोचण्यासाठी त्याचा कितपत उपयोग होतो, ते येणाऱ्या निवडणुकीत समजेल; मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल याबद्दल आजतरी प्रश्‍नचिन्ह कायम आहे. निवडणुका चौरंगी होणार असल्याने यंदा रंगतदार सामने पाहायला मिळणार हे नक्की !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com