आघाडी करून बेरजेचे राजकारण

आघाडी करून बेरजेचे राजकारण
आघाडी करून बेरजेचे राजकारण

पुणे - मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर काही जागांकरिता आघाडी केली असली, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यातही बेरजेचे राजकारण केल्याचे या पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरून आढळून आले. आघाडी करून कॉंग्रेसला केवळ 30 जागा देऊन त्यांची बोळवण केली असून, त्यातही शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग सोडले आहेत. दुसरीकडे पक्षाचा प्रभाव असलेल्या उपनगरांमधील जागांमध्ये पक्षाने सिंहाचा वाटा घेतला आहे.

महापालिकेच्या 41 पैकी 22 प्रभागांमध्ये स्वतंत्रपणे, तर उर्वरित 19 प्रभागांत आघाडी करून लढण्याचा निर्णय दोन्ही कॉंग्रेसने घेतला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या प्रभागांमधील 84 जागांसाठी दोन्ही कॉंग्रेस आमनेसामने येणार आहेत. तर, 76 जागांसाठी आघाडीचे उमेदवार देण्यात आले आहेत. त्या-त्या प्रभागांमधील पक्षांच्या ताकदीनुसार जागावाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यावर राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला आहे. विशेषतः बालेकिल्ला असलेल्या नगर रस्ता परिसरातील सहापैकी एकाच, म्हणजे फुलेनगर- नागपूरचाळ (प्रभाग क्र. 2) मध्ये आघाडी केली असून, त्यातील एकच जागा कॉंग्रेसला सोडली आहे. तसेच, हडपसरमधील मुंढवा- मगरपट्टासिटी (क्र. 22) आणि हडपसर गावठाण- सातववाडी (क्र. 23) या दोन्ही प्रभागांत पक्षाला मानणारा मतदार असल्याने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. मात्र, या प्रभागात आघाडी फेटाळून लावत आपल्या समर्थकांसाठी कॉंग्रेसने उमेदवार दिले आहेत. पक्षाच्या एका माजी आमदाराच्या आग्रहाखातर आघाडी असतानाही कॉंग्रेसने आपले उमेदवार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉंग्रेसचा मतदार असलेल्या रामटेकडी- सय्यदनगरमध्ये (क्र. 24) एकमेव जागा देत राष्ट्रवादीने कॉंग्रेसचे समाधान केले. भारतीय जनता पक्षाची ताकद असलेल्या प्रभागांमध्ये आघाडी करून दोन्ही पक्षांचे उमेदवार देण्याचा निर्णय निवडणुकीआधी घेतला असतानाही आयत्या वेळी मात्र, कसबा पेठ- सोमवार पेठ (क्र. 16) प्रभागातील चारही जागा कॉंग्रेसला दिल्या आहेत. भाजपचे वर्चस्व असलेल्या शनिवार पेठ- सदशिव पेठ (क्र. 15) प्रभागात मात्र दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा घेतल्या आहेत. कोथरूडमधील दोन प्रभागांमध्ये आघाडी केली आहे. उपनगरांमधील प्रभागांमध्ये कॉंग्रेसला जागा न देता राष्ट्रवादीने आपले स्थान अधिक मजबूत करण्याची संधी यानिमित्ताने साधल्याचे अधोरेखित झाले आहे.

भाग -------------लढविणार असलेल्या जागा
                      राष्ट्रवादी -----------कॉंग्रेस
नगर रस्ता ---23---17
जुना मुंबई रस्ता ---12---8
कोथरूड ---8---4
शनिवार, सदाशिव ---2---2
पूर्व भाग ---9---19
हडपसर ---27---19
सिंहगड रस्ता, वारजे रस्ता --- 15---9
सातारा रस्ता ----19---9

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com