मांजरी रस्त्याचे पर्यायी मार्ग धोकादायक

manjari
manjari

मांजरी - येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामामुळे दोन वर्षे बंद राहणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीसाठी बांधकाम विभागाने सुचविलेले पर्यायी मार्ग धोकादायक आहेत. त्यावरील अडथळ्यांमुळे हे मार्ग मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीला सक्षमपणे न्याय देऊ शकणार नाहीत. त्यासाठी हे पर्यायी मार्ग सक्षम करण्याबरोबरच सध्याच्या मुख्य रस्त्यावरून दुचाकी व हलक्या वाहतुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मांजरी रेल्वेगेटवर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू होत आहे. हे काम पुढील दोन वर्षे चालणार आहे. या काळात मांजरी- वाघोली रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्याला पर्यायी रस्ता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने हडपसर साडेसतरानळी केशवनगर व सोलापूर महामार्ग, भापकरमळा मार्गे मांजरी अशी वाहतूक व्यवस्था सुचविली आहे. अवजड वाहनांसाठी नगर रस्ता खराडी बायपास ते मगरपट्टा हडपसर सोलापूर महामार्ग या मार्गाचा अवलंब करण्याचे कळविलेले आहे. तशा स्वरुपाचे फलकही ठिकठिकाणी लावले आहेत. 

मात्र, या  पर्यायी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. केशवनगर लोणकर वस्ती येथून साडेसतरानळी रस्त्यावर चिखल,  खड्डे तसेच झाडांचे अनेक अडथळे आहेत. तसेच हा संपूर्ण मार्ग अरुंद आहे. त्यामुळे येथून वाहने ये जा करताना नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यातच आता पर्यायी वाहतूक येथून वळविल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी बरोबरच अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. भापकरमळा या पर्याय रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडांचा अडथळा आहे . त्यामुळे या पर्यायी मार्गावरील वाहतूक सुरक्षित असेल की नाही, याबाबत प्रवाशांनी शंका व्यक्त केली आहे. 

"उड्डाणपूलाच्या कामासाठी संपूर्ण वाहतूक बंद करण्याची गरज नाही. दुचाकी व इतर हलकी वाहनांची वाहतूक होऊ शकते. पर्यायी वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविलेले मार्ग मोठ्या प्रमाणात दुरवस्थेत आहेत. साडेसतरानळी केशवनगर मार्ग अरूंद व नादुरुस्त आहे. भापकर मळा रस्त्यावर दोन बाभळीच्या झाडांचा धोका आहे. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करू नये. तसेच काम सुरु असतानाही दुचाकी व हलक्या वाहनांना येथून प्रवास करू द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाईल.'
सुरेश घुले, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

"रेल्वे प्रशासन व जिल्हाधिकारी यांनी उड्डाणपूलाच्या कामासाठी रेल्वे गेटवरील वाहतूक बंद ठेवूनच काम करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत येथून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरु ठेवता येणार नाही. साडेसतरानळी-केशवनगर या पर्यायी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. भापकरमळा रस्त्यावरील बाभळींचा अडथळा काढण्यासाठी वनविभागाने परवानगी नाकारली आहे. मात्र, प्रवाशांना त्रास होणार नाही, याबाबत काळजी घेतली जाईल.'
नकुल रणसिंग, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com