आंबेडकर भवनाची दुरुस्ती ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम काही दिवसांपासून ठप्प झाले असून, त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आंबेडकर जयंतीपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे आता सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आंबेडकर भवन उपलब्ध होणार नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

डॉ. आंबेडकर जयंतीदिनी दरवर्षी पुणे स्टेशन येथील आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या प्रेक्षागृहामध्ये व्याख्याने, जलसे, आंबेडकरी गीतांसारखे भरगच्च कार्यक्रम होतात. महापालिकेने दोन जानेवारीपासून भवनाची दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामासाठी प्रेक्षागृह, संग्रहालय व कॉन्फरन्स हॉल बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार रंगमंच व प्रेक्षागृहाच्या कामाला सुरवातही केली. परंतु, या कामाची जबाबदारी असणारे आणि व्यवस्थापक पदावरील अधिकारी सुटीवर गेले आहेत, तर अन्य अधिकारी या कामाची पाहणी करण्यासाठी फिरकतही नाहीत. मागील दहा दिवसांपासून काम बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

भवनाच्या पहिल्या मजल्यावरील अभ्यासिकेच्या मध्यभागी बल्ब नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागत आहे. अभ्यासिकेत बनविलेल्या कपाटांना काचा व कुलूपही बसविले नाहीत. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. संग्रहालयाची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात रचना विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र तो होऊ शकला नाही. 

याबाबत रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहर युवक आघाडीचे शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिले. चव्हाण म्हणाले, ‘‘दुरुस्ती व नूतनीकरणासाठी सव्वाकोटी रुपये असूनही भवनाचे काम अर्धवट आहे. हे त्वरित करावे, अभ्यासिकेत पाणी, खुर्च्या द्याव्यात आणि भवनाच्या विस्तारीकरणाची जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.’’

Web Title: Ambedkar Bhavan Repair stop