शहरभर 'जय भीम'चा जयघोष

शहरभर 'जय भीम'चा जयघोष

पुणे : डोक्‍यावर निळ्या रंगाचा फेटा बांधून हातात भीम ज्योत घेऊन एकमेकांना "जय भीम'च्या शुभेच्छा देत हजारो भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. रक्तदान, अन्नदान, पाणीवाटप या उपक्रमांसह साहित्य संस्कृतीचे प्रदर्शन घडविणारी पुस्तके एकमेकांना भेट देऊन शनिवारी डॉ. बाबासाहेबांची 127 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. बाबासाहेबांच्या पुतळ्यास फुलांचा हार अर्पण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नागरिकांनी येथे भेट दिली. सर्वपक्षीय राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. ठिकठिकाणांहून आलेल्या भीम ज्योतींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. परिसरात भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांचे पुतळे, छायाचित्रे यांसह राज्यघटनेच्या प्रतींसह आंबेडकरी साहित्यविषयक पुस्तकांच्या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. येणाऱ्या भीम उपासकांसाठी स्वयंसेवी संस्था, बॅंका, राजकीय व सामाजिक संस्थांतर्फे पाणी तसेच दूध, शीतपेय, आईस्क्रीम आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात जयंतीनिमित्त भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला अनेकांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र साहित्य, वाङ्‌मय, महात्मा फुले समग्र साहित्य आदी पुस्तके खरेदी केली. शहरात अनेक भागात बाबासाहेबांवर रचलेल्या गीतांवर "भीमोत्सवा'चा जागर करण्यात आला. 

उदबत्ती, फुले नको, पुस्तके अर्पण करा 
पुष्पहार, फुले, उदबत्ती आणि मेणबत्त्या आणण्यापेक्षा डॉ. बाबासाहेबांच्या चरणी पुस्तके अर्पण करा, असे आवाहन समता सैनिक दलाचे कार्यकर्ते येणाऱ्या नागरिकांना करत होते. त्यांच्या आवाहनास नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. अनेकांनी पुस्तके दिली. ही पुस्तके दलातर्फे बौद्ध विहारांमध्ये देण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com