भाजपच्या कार्यपद्धतीमुळे रा. स्व. संघाचाही भ्रमनिरास 

भाजपच्या कार्यपद्धतीमुळे रा. स्व. संघाचाही भ्रमनिरास 

पुणे - "भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती पाहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही भ्रमनिरास झाला आहे, तर दोन्ही कॉंग्रेसमध्ये आघाडी झाली असली, तरी त्यांचा भ्रष्ट कारभार जनतेने पाहिला आहे. त्यामुळे विकास आणि जनतेशी कटिबद्ध असलेल्या शिवसेनेच्या पाठीमागे पुणेकर जनता उभी राहील,' असा विश्‍वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. "शिवसैनिकांनो, यापूर्वी अनेकांच्या पालख्या आपण उचलल्या. आता भगव्याची पालखी उचला आणि महापालिकेवर भगवा फडकू द्या,' असे आवाहनही त्यांनी केले. 

महापालिका निवडणुकीच्या मैदानात शिवसेना स्वबळावर उतरली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. कोल्हे यांच्याशी केलेली बातचीत. 
प्रश्‍न : पुण्यात युती तुटण्यामागचे कारण काय? 

उत्तर : युती तुटण्यामागचे खरे कारण यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या डोक्‍यात हवा गेली आहे. जमिनीपासून दोन फूट ते वर चालत आहेत. मुंबईप्रमाणे पुण्यातही त्यांची वागणूक अशीच आहे. युती तुटल्याचा सकारात्मक परिणाम आम्हाला दिसत आहे. शिवसैनिकही खूष आहेत. किती दिवस आम्ही त्यांचे ओझे वाहणार? त्यामुळे झालेला निर्णय योग्यच आहे. 

प्रश्‍न : युती नसल्यामुळे मतविभाजनाचा फायदा आघाडीला होऊ शकतो का? 
उत्तर : असे वाटत नाही. युती की आघाडी ही तुमचे मनोमिलन किती झाले यावर अवलंबून असते. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली असली, तरी त्या दोघांमध्ये किती मनोमिलन झाले आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. यापेक्षा आघाडीचा भ्रष्ट कारभार पुणेकरांनी पाहिला आहे, त्यामुळे पुणेकर नक्कीच शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील असा विश्‍वास वाटतो. 

प्रश्‍न : या निवडणुकीतील पक्षाचा प्रमुख विरोधक, शत्रू कोण वाटतो? 
उत्तर : खरे तर आम्ही कोणाला शत्रू मानत नाही. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा त्या रेषेपेक्षा आपली रेष कशी मोठी होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. या शहरात कॉंग्रेसचा काही परंपरागत मतदार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याला मानणारा वर्ग आहे. तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जो भाजपच्या पाठीशी होता; परंतु आता संघाचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला जे यश पुणे शहरात मिळाले, ते या महापालिका निवडणुकीत मिळेल, असे वाटत नाही. विकास आणि त्यासाठी वचनबद्ध असलेल्या शिवसेनेच्या पाठीशी पुणेकर जनता उभी राहील. 

प्रश्‍न : पक्षाची पुढील वाटचाल, रणनीती काय राहील? 
उत्तर : सत्तेपेक्षा जनतेशी आमची बांधिलकी आहे. आमचा वचननामा पाहिला, तरी हे दिसून येईल. आम्ही दिलेला शब्द पाळतो. जो शब्द पाळता येईल, तोच देतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर, पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने मोफत बससेवा, समान पाणीपुरवठा आदी आश्‍वासने आम्ही वचननाम्यात दिली आहेत. मुंबईत आम्ही जे शब्द दिले ते पूर्ण केले. त्यातूनच कचरा, वाहतूक असे अनेक प्रश्‍न मार्गी लागले. पुणे शहराचे जे प्रश्‍न आहेत, ते सोडविण्याचे वचन आम्ही दिले आहे, आम्ही सत्तेत आल्यानंतर ते सोडविणारच. 
 

प्रश्‍न : शिवसैनिकांना काय संदेश देणार? 
उत्तर : भगव्याचे एक तेज आहे, हे तेज कमी होऊ देऊ नका. आजपर्यंत अनेकांच्या पालख्या आपण उचलल्या, त्या पालखीत दुसरेच बसले. परंतु, आता भगव्याची पालखी उचला. साहेबांनी तुमच्यावर विश्‍वास टाकला आहे, त्याला तडा जाऊ देऊ नका. आलेल्या संधीचे सोने करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com