भाजपची पुण्याची निवडणूक सध्यातरी निर्नायकी!

अमित गोळवलकर
गुरुवार, 19 जानेवारी 2017

एकदा शंकर भगवान पार्वतीसह आकाशातून विहार करत असतात. खाली पृथ्वीतलावर एक माणूस शंकराचा जप करत रस्त्यातून चाललेला असतो. पार्वती शंकराला सांगते की हा तुमचा भक्त आहे, त्याला काहीतरी द्या. शंकर भगवान म्हणतात, मी काहीही दिले तरी ते त्याच्या नशिबात नाही. पण पार्वतीला ते पटत नाही. अखेर शंकर भगवान या माणसाच्या वाटेत एक सोन्याची वीट टाकतात. पण तेवढ्यात त्या माणसाला आपण आंधळे झाल्यावर कसे चालू शकू, हे पाहण्याची हुक्की येते आणि तो आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून चालायला लागतो आणि नेमकी ती वीट ओलांडून पुढे जातो.

पुणे महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सारे राजकीय वारे भाजपच्या दिशेने वाहताना दिसत आहेत. आजवर जे काही अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त केले गेले, त्यांचाही कल भाजपकडेच होता. पण पक्ष पातळीवर मात्र काही वेगळेच चालल्याचे दिसते. 

एकतर गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये इनकमिंगने चांगलाच वेग पकडला होता. पण त्यातले किती जण भाजपला उपयोगी पडतील, याबाबत शंका व्यक्त केल्या गेल्या. ज्यांच्या पुढाकाराने हे इनकमिंग झाले, त्यांचे पक्षातले आणि संघवर्तुळातले 'स्टँडिंग' काय, हा देखिल प्रश्नच आहे. दुसऱ्या बाजूला पक्षाकडून निवडूक लढवू इच्छिणाऱ्या हजाराहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेबरोबरच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

ही युती होणार नाही, ही दाट चिन्हे आहेतच. दुसरीकडे आघाडीच्याही चर्चा आहेत. आघाडीची शक्यताही धुसर आहे. पण ती झालीच तर त्यातून मनसेसारख्या पक्षाला आपोआपच उमेदवार मिळतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादींच्या मतांमध्ये फूट पडेल, असे आडाखे भाजपच्या गोटात बांधले जात आहेत. शहर पातळीवर युती व्हावी ही कुणाचीच इच्छा नाही. कारण त्यांच्यावर अजूनही मोदी लाटेचा इफेक्ट आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद-नगरपालिका निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे यश मिळाले, त्यातून तर भाजप कार्यकर्त्यांच्या आशा अधिकच पल्लवीत झाल्या आहेत. 

मात्र, केवळ मोदी आणि फडणवीस यांच्या करिष्म्यावर आपण महापालिकेवर सत्ता मिळवू हा जर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा विश्वास असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जे डावपेच करावे लागतात ते केले नाहीत, तर तोंडाशी आलेला घास हातातून निघून जाऊ शकतो, याची जाणीव इथल्या भाजप नेतृत्वाला झालेली नाही. 

निवडणुकीत आपल्या उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करतानाच विरोधकांच्या पाडावाचीही गणिते आखावी लागतात. कधी दुसऱ्याची मते फोडण्यासाठी तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला बळ द्यावे लागते. काही वेळा जाणून बुजून अशा पक्षांमध्ये माणसे घुसवावी लागतात. मतांच्या विभाजनासाठी विशिष्ट समाजाचा ज्यांना पाठिंबा आहे, अशा पक्षांच्या नेत्यांना रसद पुरवावी लागते. पण सध्यातरी भाजपमध्ये हे काही होताना दिसत नाहीये.

हे सारे करायचे, ठरवायचे असते ते पक्षाच्या स्थानिक नेतृत्त्वाने. सुदैवाने आज पक्षाकडे आठ आमदार आणि लोकसभेचे एक खासदार आहेत. पुण्याचेच असलेले एक नेते केंद्रात मंत्रीपदावर आहेत. राज्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद पुण्याच्या वाट्याला आले आहे. राज्यसभेचे खासदार सध्या उड्या मारत असले तरीही त्यांच्याबाबत पक्षात नाराजीचा सूर आहे. 

अशावेळी सामुहिक नेतृत्त्वातून आणि निर्णय प्रक्रियेतून निवडणूक पुढे न्यायची सोडून स्थानिक नेतृत्व मात्र काटाकाटीच्या राजकारणात अडकल्याचे दिसते. ज्यांनी हे करणे अपेक्षित होते, त्यांच्याकडे पाच विधानसभा निवडणुकांच्या विजयाचा अनुभव आहे. पण दुर्दैवाने ते अजूनही पारंपारिक राजकारणातच अडकल्याचे दिसतात. ही निवडणूक माझीच, येणारा विजय हा माझ्याच नेतृत्वाखाली मिळाला आहे, हे दाखवून देण्याची उत्तम संधी या नेतृत्त्वाकडे होती. आता गटातटाचे राजकारण करण्याचे त्यांचे वय नाही आणि त्यांना ते शोभतही नाही. 

अजूनही या नेतृत्वाला मानणारा मोठा गट आहे. त्या पलीकडे जाऊन संपूर्ण शहराची निवडणूक कवेत घेण्याची संधी सोडून हे नेतृत्त्व जर एखाददुसऱ्या जागांवर कोण हवे, कोण नको याची चर्चा करीत असेल आणि त्या दृष्टीने आपले राजकारण हाकत असेल तर मग पुणे शहर भाजपला निवडणुकीसाठी शुभेच्छाच द्यायला हव्यात. 

केवळ मुख्यमंत्री-पंतप्रधानांचे फोटो जाहीरनाम्यावर लावून आणि केंद्राने आणि राज्याने घेतलेल्या निर्णयांचे गोडवे गावून स्थानिक पातळीवरची निवडणूक जिंकता येत नाही. यंदाची निवडणूक ही पक्षाच्या पातळीवरची असेल असे कितीही म्हटले तरी स्थानिक निवडणुकांत व्यक्ती ही पाहिली जातेच. त्या दृष्टीने जर या पक्षाच्या नेतृत्त्वाने आपली पुढची पावले टाकली, तर आणि तरच भाजपला शहरात 'मॅजिक' फिगर गाठता येईल. 

या स्थितीत एक गोष्ट आठवली. एकदा शंकर भगवान पार्वतीसह आकाशातून विहार करत असतात. खाली पृथ्वीतलावर एक माणूस शंकराचा जप करत रस्त्यातून चाललेला असतो. पार्वती शंकराला सांगते की हा तुमचा भक्त आहे, त्याला काहीतरी द्या. शंकर भगवान म्हणतात, मी काहीही दिले तरी ते त्याच्या नशिबात नाही. पण पार्वतीला ते पटत नाही. अखेर शंकर भगवान या माणसाच्या वाटेत एक सोन्याची वीट टाकतात. पण तेवढ्यात त्या माणसाला आपण आंधळे झाल्यावर कसे चालू शकू, हे पाहण्याची हुक्की येते आणि तो आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून चालायला लागतो आणि नेमकी ती वीट ओलांडून पुढे जातो. 

पुणे शहर भाजपचं नेमकं हेच झालं आहे. एकमेकांच्या द्वेषाची पट्टी डोळ्यांवर ओढून नेते वाटचाल करत आहेत. त्यामुळे समोर पडलेल्या सत्तेच्या सोन्याच्या वीटेला एकतर ते अजाणतेपणी धडकतील किंवा वीट ओलांडून पुढेही जातील. ही वीट हस्तगत करायची तर मात्र डोळ्यांवरची ही पट्टी त्यांनी काढायला हवी.