जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

दत्ता म्हसकर
मंगळवार, 24 एप्रिल 2018

जुन्नर येथे सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असून सदस्यांच्या बेल्हे - 17, गुंजाळवाडी - 9 व तांबेवाडी - 7 अशा एकूण 33 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 
 

जुन्नर - राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावासह गुंजाळवाडी व तांबेवाडी या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येथे सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असून सदस्यांच्या बेल्हे - 17, गुंजाळवाडी - 9 व तांबेवाडी - 7 अशा एकूण 33 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 

कल्याण-नगर मार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले बेल्हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जाते. या गावचे सरपंच पद खुल्या गटासाठी आहे. यामुळे या पदासाठी अनेक इच्छुक दावा करीत आहेत. गावपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे प्रबळ पक्ष असल्याने राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे. थेट सरपंच पदासह सदस्य पदासाठी देखील तीनही ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांचा फड चांगलाच रंगणार असल्याची चर्चा होत आहे. ही तीनही गावे तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसर रविवार ता. 23 च्या मध्यरात्री पासुनच आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. रविवार ता. 27 मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. यात जुन्नर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या पूर्ण तर 46 ग्रामपंचायतीच्या 86 वार्डातील 135 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 

तहसिलदार शुक्रवारी ता. 27 एप्रिल रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करतील, सोमवार ता. 7 ते शनिवार 12 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणे, सोमवार ता. 14 मे रोजी उमेदवारी अर्ज छाननी, बुधवार ता.16 मे अर्ज माघारी घेणे नंतर त्याच दिवशी चिन्ह वाटप, तर रविवार ता. 27 मे रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींच्या 135 रिक्त पदांच्या जागांसाठीच्या निवडणुका सुध्दा याच कालावधीत होणार आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Announcing the program for the gram panchayat elections in Junnar taluka