चांगल्या समाजासाठी "माणूसपण' जपा 

चांगल्या समाजासाठी "माणूसपण' जपा 

पुणे - सध्या धावपळ आणि आधुनिक जीवनशैलीत माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. एचआयव्ही एड्‌सबद्दल असलेला गैरसमज असो किंवा विशेष मुलांना सामाजिक प्रवाहात स्वीकारण्याची मानसिकता असो, आजही याबाबतची मानसिकता बदललेली नाही. हे चित्र बदलण्यासाठी आणि चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्यातील माणूस शोधून माणूसपण जपले पाहिजे, असे मत सामाजिक क्षेत्रातील महिलांनी बुधवारी "आर्ट टू हार्ट' या कार्यक्रमातील परिसंवादात व्यक्त केले. 

महिला दिनानिमित्त "सकाळ'ने आयोजिलेल्या या कार्यक्रमात प्रीझम संस्थेतील कलिका गांधी, मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनच्या डॉ. मधू ओसवाल आणि लक्ष्य फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी सहभाग घेतला. योगेश देशपांडे यांनी मुलाखत घेतली. 

प्रभुदेसाई म्हणाल्या,""सीमेवर आपल्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानाला समजून घेण्याची कुवतच आपल्यात नाही. जो सीमेवर राहून आपल्यासाठी गोळी झेलतो आणि प्राणपणाला लावतो त्याचा आदर केला पाहिजे. त्याच्यातील कर्तव्यदक्षता, शिस्तबद्धता या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजेत. प्रत्येक जण सैनिक होणार नाही; पण सैन्यदलाविषयी आदर तर ठेवू शकतो. त्यांच्या कामाबद्दल बोलू शकतो.'' 

डॉ. ओसवाल म्हणाल्या,""या आजाराबद्दल समाजात अजूनही गैरसमजुती आहेत; पण हळूहळू त्यात सकारात्मक बदल होत आहे. हे जनजागृतीने घडले. ज्या समाजात लोक या आजाराविषयी बोलायलाही घाबरत होते, आज ते मुक्तपणे यावर संवाद साधत आहेत. एचआयव्हीसह जगणारी व्यक्तीही चांगले आयुष्य जगू शकते. फक्त विचार बदलला पाहिजे.'' 

कलिका गांधी म्हणाल्या,""गेली 25 वर्षे मी विशेष मुलांसाठी काम करत आहे. या लोकांमधील कार्यशक्ती आणि ऊर्जा वेगळीच असते. फक्त आपल्याला ती हेरता आली पाहिजे. 18 ते 35 वयोगटातील विशेष लोकांना आम्ही स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देत आहोत. त्याच्यातील प्रामाणिकपणा, ऊर्जा आणि वेगळेपणच आम्हाला काम करण्यास प्रेरित करते. या लोकांसाठी आपण पुढे येऊन काम केले पाहिजे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com