मीही करणार होतो आत्महत्या; पण...

मीही करणार होतो आत्महत्या; पण...

कुणाला परीक्षेत मार्क्‍स कमी मिळाले म्हणून आत्महत्या करावीशी वाटतेय, तर कुणाला आपली गर्लफ्रेंड चक्क ‘नाही’ म्हणाली म्हणून...आजकाल असं चटकन एखादंच कारण पुरतं तरुण-तरुणींना आत्महत्या करायला... पण खरंच आत्महत्येएवढा टोकाचा विचार करणं योग्य आहे? नाहीच! म्हणूनच तर ज्याने स्वतःही कधीतरी डोक्‍यात आलेला आत्महत्या करण्याचा विचार फेकून दिला आणि आज तो एक आनंदी आयुष्य जगतोय अशा शंतनूशी (नाव बदललं आहे) आम्ही बोललोय... वाचा त्याच्याच शब्दांत...

मी मूळचा एक हुशार मुलगा. अभ्यासासोबतच मी एक्‍स्ट्रॉ करिक्‍युलर ॲक्‍टिव्हिटीजमध्येही नेहमी पुढे असायचो. बारावीच्या मार्कांवर इंजिनिअरिंगला गेलो.

इथपर्यंत सगळं काही छान सुरू होतं; पण इथून पुढे काहीतरी बिघडत गेलं. इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरनंतर एके दिवशी माझ्या आयुष्यात सगळंच काही बदलून गेलं. कारण, आता माझ्या आयुष्यात ‘ती’ आली होती. पाहता पाहता माझी मैत्रीण; मग चांगली मैत्रीण, मग सगळ्यात जवळची मैत्रीण... आणि त्यानंतर गर्लफ्रेंड झाली ती; पण हे सगळं एवढं छान सुरू राहणं नियतीला नको असावं बहुधा...आणि एके दिवशी एवढ्याशा कारणावरून आमचं ब्रेकअप झालं.

एवढे दिवस प्रेमात रमलेला मी, त्यामुळे अभ्यासाची तर पार वाटच लागली होती. तशात मी नापास झालो. एवढा हुशार मुलगा असा एक वर्ष घरी बसणार म्हटल्यावर वडिलांना तर मोठाच धक्का बसला. त्यांना आधीच दारूची सवय... माझ्या या निकालानंतर त्यांचं पिणं आणखी वाढलं. घरात आमच्यात वाद आणि भांडणंही वाढली. मला ठाऊक होतं, की या सगळ्याला मीच जबाबदार आहे म्हणून... अशातच या डिप्रेशनमध्ये एके दिवशी आत्महत्येचा विचारही मनाला शिवून गेला. मनात काहीशी भीती होतीच, मात्र विचार जवळपास पक्का झाला होता. पण, जवळच्या काही चांगल्या मित्रांच्या सपोर्टमुळे मी त्यातून बाहेर पडू शकलो...

मित्रांनो, या सगळ्या अनुभवातून मला कळून चुकलंय की आत्महत्या करणं किती चुकीचं आहे ते. माझ्यानंतर घरच्यांचं काय होणार? माझ्या स्वतःच्या एवढ्या मनापासून पाहिलेल्या स्वप्नांचं काय होणार? आपण ज्या गोष्टींना स्वतःच्या आयुष्यापेक्षाही मोठं समजतो, त्या खरंच तशा आहेत का?... असे अनेक प्रश्‍न मला पडले आणि त्यांच्या उत्तरांतूनच मला आत्महत्या न करण्याचं सकारात्मक बळही मिळालं.

आज मी समाधानी आहे. मी तुम्हालाही सांगेन-आपलं आयुष्य पोटभर जगा. असं आत्महत्या करून संपवून टाकू नका. त्रासाचे प्रसंग येतील तसेच जातीलही; पण आपलं जगणं महत्त्वाचं. आणि समजा मरायचंच असेल ना, तर असे नका मरू, काहीतरी चांगलं करून मरा ना! कारण, आज ना उद्या सगळ्यांनाच मरायचंय...

प्रेमभंग हे महत्त्वाचे कारण

एकतर्फी प्रेम, नोकरी न मिळणे याबरोबरच परीक्षेचा ताण, निकाल आणि त्यावर घरातले काय म्हणतील, याची असणारी धास्ती अशा अनेक कारणांनी मनात डोकावणारा आत्महत्येचा विचार करणारे वर्षाला साधारणतः १५ हजार जण ‘हेल्पलाइन’चा आधार घेतात. त्यातील ७० ते ७५ टक्के ‘कॉल्स’ हे प्रेमप्रकरणातून आत्महत्येचा विचार मनात डोकावणाऱ्या युवकांचे असतात; तर परीक्षा आणि निकालाच्या वेळी या ‘कॉल्स’च्या प्रमाणात १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ होते, अशी धक्कादायक माहिती ‘कनेक्‍टिंग एनजीओ’ या संस्थेने दिली आहे.

आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी या संस्थेतर्फे २००८पासून हेल्पलाइन चालविली जाते. दहावी-बारावीबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा परीक्षा सुरू असताना आणि विविध परीक्षांच्या निकालाच्या वेळी या कॉल्समध्ये १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ होते. सर्वाधिक कॉल्स २० ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांचे असल्याचे दिसून आल्याचे संस्थेचे समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी सांगितले.

घरातील वादावादी, अभ्यासाचा ताण, नोकरी न मिळणे, आर्थिक समस्या यातून येणाऱ्या नैराश्‍यामुळे आत्महत्येचा विचार मनात येतो; परंतु हा विचार मनात घोळत असताना गरज असते ती कोणाशी तरी मनमोकळा संवाद साधण्याची. अर्थात, अशावेळी कोणत्याही जवळच्या व्यक्तीशी संवाद साधण्याची इच्छा नसते. मग एखाद्या तिसऱ्या व्यक्तीशी बोलणे कधीही सोईस्कर असते. बरं, ही तिसरी व्यक्तीही उपदेश देणारी नको असते, तर ती आपलं म्हणणे ऐकून आणि समजून घेणारी असावी लागते, नेमकी हीच भूमिका हेल्पलाइनवरील स्वयंसेवक निभावतात. 

पवार म्हणाले, ‘‘हेल्पलाइनवर एखादा कॉल आला, तर आम्ही त्याला नाव, गाव, पत्ता असे काहीच प्रश्‍न विचारत नाही. त्या व्यक्तीला मनातील भावना व्यक्त करायला सांगतो. उपदेशाचे डोसही दिले जात नाहीत. खरंतर अशावेळी आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या व्यक्तीला मानसिक आधार देण्याची गरज असते. कॉल केलेल्या व्यक्तीच्या भावनांमध्ये समरस झाल्याची जाणीव त्याला होणे आवश्‍यक असते. मग त्याला आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी वेगवेगळे पर्याय सुचविले जातात. गरज पडल्यास समुपदेशक, वैद्यकीय, आर्थिक सल्ला देणाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले जातात.’’

टोल फ्री हेल्पलाइन
आत्महत्येचा विचार मनात डोकावतोय...मग जरा थांबा...आधी ‘१८००-२०९-४३५३’ यांच्याशी बोला. आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम करणारी ही टोल फ्री हेल्पलाइन दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असते.

वयानुसार हेल्पलाइनवर फोन करण्याची कारणे :-
- वयोगट : कारणे

१३ ते २१ : प्रेमप्रकरणे, अभ्यासाचा ताण, घरातील वाद
२१ ते २९ : प्रेमप्रकरणे, कौटुंबिक समस्या, आर्थिक
३१ ते ६९ : कौटुंबिक समस्या, मानसिक आजार, आर्थिक, आजारपण

नवउमेदीने उभे राहण्याचे बळ मिळवा
सिंहगड संस्थेच्या एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बुधवारी आत्महत्या केली. आत्महत्या करणे हा आयुष्याचा शेवटचा पर्याय नाही. नैराश्‍य प्रत्येकालाच येते. त्या परिस्थितीचा सामना आत्मविश्‍वासाने आणि सकारात्मकतेने केले पाहिजे, असे मत तरुणांनी व्यक्त केले.

गौरव चौधरी (स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी) - ज्या गोष्टीत आपल्याला यश मिळत नाही, त्याकडे नवउमेदीने पाहात त्यासाठी आणखीन मेहनत करावी. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी नैराश्‍य येते; पण त्या परिस्थितीचा सामना करून ते नव्याने उभे राहतात.

धनश्री पाटील (विद्यार्थिनी) - परीक्षेत कित्येकदा मेहनत करूनही कमी गुण मिळतात; पण त्यात नैराश्‍य येण्यासारखे काय? प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. त्यामुळे परिस्थितीचा सामना करायला शिका आणि आयुष्य संपविण्याचा विचार सोडून द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com