'आर्टिफिशियल' गुढ्यांना पसंती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

पारंपरिक गुढीसाठी विविध जातींचे कळक बाजारात

पारंपरिक गुढीसाठी विविध जातींचे कळक बाजारात
पुणे - गुढीपाडव्यानिमित्त भेटवस्तू म्हणून आर्टिफिशियल गुढी देण्याला पुणेकर पसंती दर्शवू लागले आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेला, अर्थात गुढीपाडव्या (ता. 28) रोजी कळकाला खण आणि साडी नेसवून गुढी उभी करण्यासच विशेष महत्त्व असल्याने कळकाला मोठी मागणी आहे. सध्या बाजारात आसाम राज्यातून, तसेच पानशेत, वेल्हा, चिपळूण, नागपूर येथून विविध जातींचे कळक आले आहेत. कळक खरेदी सोबतच नागरिक बालगोपाळांसाठी किंवा घरातल्या सजावटीसाठी आर्टिफिशियल गुढ्या खरेदी करताना दिसून येत आहे.

वाडा संस्कृतीच्या जागी फ्लॅट संस्कृती विकसित झाली असून जागेअभावी लोक आर्टिफिशियल गुढी देवघरात ठेवून पूजन करू लागले आहेत. परिणामी ग्राहकांच्या मागणीनुसार आर्टिफिशियल गुढ्या बाजारात येऊ लागल्या आहेत.

बाजारपेठ सजली
- गुढीचे प्रतिकात्मक रूप
- सहा इंचापासून पाच फुटापर्यंत गुढ्या
- पारंपरिक गुढी करिता बुरूड गल्लीत कळक
- फ्लॅटच्या खिडकीत किंवा व्हरांड्यात गुढी
- तीन फुटांपासून कळकांची मागणी

लग्नामध्ये रुखवतात, घरातील शोकेसमध्ये किंवा सजावटीकरिताही नागरिक आर्टिफिशियल गुढी खरेदी करतात. विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्राकडून या गुढ्यांना अधिक मागणी असते. ऐंशी ते पाचशे रुपयांदरम्यान या गुढ्या विक्रीस उपलब्ध आहेत.
- समीर अत्तार, विक्रेते

गुढीकरिता हिरव्या रंगांच्या कळकास विशेष महत्त्व असते. शहरात वाडे अधिक होते, तेव्हा नागरिक दहा फुटांहून अधिक उंचीच्या कळकावर गुढी उभारत असत. फ्लॅट संस्कृती वाढीस लागल्यापासून कळक विक्रीवरही मर्यादा आली. तीन फुटांपासून मागणीनुसार कळक बाजारात उपलब्ध झाले आहे.
- भगवान पवार, विक्रेते

Web Title: artificial gudhi demand