यवतला पोलिसांवर हल्ला 

यवतला पोलिसांवर हल्ला 

केडगाव/यवत - यवत (ता. दौंड) पोलिसांत फिर्याद देण्यासाठी आलेल्या दोन गटांतील लोकांनी एका अधिकाऱ्यासह चार पोलिसांवर पोलिस स्थानकात हल्ला केला. पोलिस स्थानकाच्या आवारात दोन गटांत हाणामारी होत असताना या जमावास पोलिस वेगळे करीत होते. त्याचवेळी जमावाने पोलिसांना लक्ष्य केले. यात एकाने दगड मारल्याने पोलिस निरीक्षक सूरज बंडगर हे गंभीर जखमी झाले. अन्य तीन पोलिसांना जमावाने मारहाण केली. 

हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री यवत येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सात जणांना अटक करण्यात आली असून, आरोपी धायगुडेवाडी (ता. दौंड), फुरसुंगी व दौंड येथील आहेत. मुन्ना ऊर्फ संजय राजेश लोंढे, पद्मिनी आबा कसबे, फुलाबाई राजू लोंढे, विकास वसंत राखपसरे, बाळासाहेब सुरेश राखपसरे, वसंत भाऊसाहेब राखपसरे, संगीता वसंत राखपसरे, अवी सुरेश राखपसरे (सर्व रा. फुरसुंगी, ता. हवेली), सतीश आबा कसबे, छगन मारुती भाले, सोमनाथ राजेंद्र कसबे, नाना ऊर्फ बाळासाहेब नारायण लोंढे, विठ्ठल राजेश लोंढे, माणिक शिवाजी भाले, प्रमोद दादा अवचट, सचिन राजेश लोंढे (सर्व रा. धायगुडेवाडी, ता. दौंड) व इतर अनोळखी ८ ते १० जण; तसेच इनोव्हा मोटारीतील इक्‍बाल मुबारक शेख, इम्रान शेख (दोघे रा. खाटीक गल्ली, दौंड) व त्यांचे अन्य दोन अनोळखी साथीदार हे संशयित आरोपी आहेत. त्यांच्यावर दंगल घडविणे, गंभीर दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

चौफुला- धायगुडेवाडीमधील गारूडगल्लीत राहणाऱ्या महिलांमध्ये गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडणे झाली. त्यात घरातील पुरुष मंडळी पडली. यात एका पुरुषाने एका महिलेला मारल्याने तेथे दोन गटात तुफान दगडफेक करत हाणामारी झाली. दगडफेकीमुळे भांडणे सोडवायला गेलेली स्थानिक मंडळी पळून गेली. घटनेची माहिती मिळाल्याने यवत पोलिस घटनास्थळी गेले व त्यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी दोन्ही गटाचे लोक यवत पोलिस स्थानकात जमा झाले. दोन्ही फिर्यादींनी दौंड व फुरसुंगी येथून भाडोत्री गुंडांना यवत येथे बोलविल्याने मध्यरात्री पोलिस स्थानकात परिस्थिती तणावपूर्ण झाली.

या जमावात परस्परांमध्ये दगड, काठ्या, हाताने, लाथाबुक्‍क्‍यांनी हाणामारी सुरू झाली. पोलिसांसमोर हा प्रकार घडत असल्याने पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला. तेव्हा मुन्ना लोंढे याच्याबरोबर आलेल्या एकाने पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या दिशेने दगड भिरकावला. हा दगड बंडगर यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागाला लागला. या जखमेत सात टाके पडून बंडगर यांचा डोळा सुजला आहे. याच वेळी महिला पोलिस कर्मचारी स्नेहल गायकवाड व मुत्ताप्पा संकुल, हवालदार बापूराव बंडगर यांनाही जमावाने मारहाण केली. यात हे तिघेही किरकोळ जखमी आहेत. 

सूरज बंडगर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांनी यवतला भेट देऊन बंडगर यांची विचारपूस केली. पुढील तपास फौजदार विनायक दरेकर हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com