केजरीवाल, आमची 'इव्हीएम' हॅक करून दाखवाच! 

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 16 मे 2017

'कुठलंही मशीन हॅक होऊ शकतं' असा दावा करणारा प्रत्येक जण तज्ज्ञच असतो, असे नाही. इकडून-तिकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे अशी विधाने केली जातात. 'असं नाहीये; मला माहितीये' असंच बोलणाऱ्याला तुम्ही काय समजावणार? 
- अतुल गावडे 

पुणे : 'केजरीवाल, ही 'इव्हीएम' हॅक होऊ शकत नाहीत. जमत असेल, तर करून दाखवा हॅक!' असे आव्हान देशातील एकमेव खासगी 'इव्हीएम' उत्पादक अतुल गावडे यांनी 'आप' आणि अरविंद केजरीवाल यांना आज (मंगळवार) दिले.

गोवा, पंजाबमधील विधानसभा आणि दिल्लीतील मनपा निवडणुकीत सपाटून मार खालेल्ल्या 'आप'ने या पराभवाचे खापर 'इव्हीएम'वर फोडले. इतकेच नव्हे, तर निवडणुकीत वापरलेल्या 'इव्हीएम'सारखे एक यंत्र 'हॅक' करून दाखविण्याचा प्रकारही 'आप'ने करून दाखविला होता. मात्र, हे बनावट 'इव्हीएम' होते आणि आमचे 'इव्हीएम' हॅक करून दाखवा, असे आव्हान गावडे यांनी दिले. 

गावडे यांनी आज 'सकाळ'च्या पुणे कार्यालयात येऊन 'इव्हीएम'विषयी माहिती दिली. 'कुठलंही बटन दाबलं, तरीही मत भाजपलाच जाते' हा विरोधकांचा दावा त्यांनी प्रात्यक्षिकासह खोडून काढला. त्याचबरोबर, 'हॅक' करून दाखवाच हे आव्हान केवळ 'आप'साठीच नसून बिनबुडाचे आरोप करणाऱ्या प्रत्येकाला आहे, असेही गावडे यांनी स्पष्ट केले. 